Developed Country: 'भारत 2047 पर्यंत विकसित देश होईल'; PM Narendra Modi यांचा संकल्प
भुज आणि परिसरातील हजारो लोक पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमले होते.
2047 पर्यंत भारताला विकसित देश (Developed Country) बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी केला. कच्छच्या एकदिवसीय दौऱ्यावर आलेले पंतप्रधान म्हणाले, ‘2001 च्या विनाशकारी भूकंपानंतर मी जिल्ह्याचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते आणि 2022 मध्ये मी बघू शकतो की किती चांगला विकास झाला आहे. आज मी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे वचन देत आहे आणि ते मी नक्कीच पूर्ण करेन.’ तत्पूर्वी, भूजमधील 'स्मृती वन' आणि अंजार येथील 'वीर बालक स्मारक' त्यांनी राष्ट्राला समर्पित केले, जे भीषण भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहेत.
जपानमधील हिरोशिमा संग्रहालयाप्रमाणे ही दोन स्मारके कच्छला जगाच्या नकाशावर आणतील, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा भूकंप झाला तेव्हा आपण दिल्लीत होतो, मात्र दुसऱ्याच दिवशी आपण गुजरातला पोहोचलो. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणारे गुजरात हे पहिले राज्य आहे, ज्याने नंतर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
पंतप्रधान म्हणाले, 'गुजरात एकामागून एक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात होते, त्यानंतर देशात आणि जगात गुजरातला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. गुजरातमध्ये येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले. मात्र गुजरातने बदनाम करण्याच्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले, ते कट उधळून लावले आणि राज्य प्रगतीच्या नव्या मार्गावर पुढे गेले.
रविवारी सकाळी पंतप्रधानांनी नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली आणि 5,000 कोटी रुपयांचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधान म्हणाले की, सरहद डेअरीचे उद्घाटन ते राज्याचे मुख्यमंत्री असताना झाले होते. त्या वेळी त्याचे दैनंदिन दूध संकलन 1,400 लिटर होते, ते वाढून 5 लाख लिटर प्रतिदिन झाले आहे. दूध उत्पादक 800 कोटी रुपये कमावत आहेत. गेल्या 20 वर्षात कच्छला 45 नवीन महाविद्यालये, 1000 नवीन शाळा, 250 रुग्णालये आणि हजारो चेकडॅम मिळाले आहेत.
आपल्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पीएम मोदी यांनी कच्छ जिल्ह्यातील भुज शहरात रोड शो केला. भुज आणि परिसरातील हजारो लोक पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. तीन किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये मोदींनी हस्तांदोलन करून लोकांना अभिवादन केले. भुज शहरातील रोड शो हिल गार्डन परिसरातून जिल्हा औद्योगिक केंद्रापर्यंत काढण्यात आला.