IPL Auction 2025 Live

Delhi Violence: दिल्लीत झालेल्या शेतकरी चळवळीतील हिंसाचारानंतर Twitter ची मोठी कारवाई; 550 हून अधिक खाती केली निलंबित

त्यावेळी लाल किल्ल्याकडे जाण्याच्या मार्गावर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये हिंसाचार उफाळला होता. उपद्रव्यांनी अनेक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले. यामध्ये 300 हून अधिक पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे

Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्लीतील शेतकरी चळवळीतील हिंसाचारानंतर (Violence) ट्विटरने (Twitter) बुधवारी 550 हून अधिक खाती निलंबित केली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी राजधानीत ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढली होती ज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. एएनआयने ट्विटरच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरच्या धोरणांचे उल्लंघन करणारे ट्विट लेबल केले गेले आहेत. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आम्ही आमच्या सेवांच्या माध्यमातून हिंसाचार, शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या लोकांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली आहे. या लोकांच्या ट्विटद्वारे ऑफलाइन हिंसाचार पसरण्याची शक्यता आहे, जे आमच्या ट्रेंडच्या नियमांविरूद्ध आहे. म्हणूनच आम्ही अशी खाती निलंबित केली आहेत.'

सोशल मीडियाच्या प्रवक्त्याने एएनआयला सांगितले की, 'तंत्रज्ञानाचा वापर आणि मानवतावादी पुनरावलोकनाच्या (Human Review) आधारे आम्ही मोठे काम केले आहे आणि ट्वीटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी शेकडो खाती व ट्वीट्सवर कारवाई केली आहे. यामध्ये स्पॅम म्हणून हा प्लॅटफॉर्म चुकीच्या पद्धतीने वापरणारी 550 खाती निलंबित करण्यात आली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइटने अशा ट्वीट्सना लेबल केले आहे जी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मीडिया धोरणाचे उल्लंघन करात आहेत. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि सावध आहोत.’ तसेच त्यानी जनतेलाही आवाहन केले आहे की, प्लॅटफॉर्मवर नियमांच्या विरोधात काही संशयास्पद दिसले तर त्याबाबत रिपोर्ट करा.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बर्‍याच भागात ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावेळी लाल किल्ल्याकडे जाण्याच्या मार्गावर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये हिंसाचार उफाळला होता. उपद्रव्यांनी अनेक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले. यामध्ये 300 हून अधिक पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हिंसाचाराबद्दल पोलिसांनी एकूण 22 एफआयआर नोंदविल्या आहेत व 200 लोकांना अटक केली आहे. (हेही वाचा: Delhi Violence: दिल्लीत घडलेल्या हिंसाचार प्रकरणी योगेंद्र यादवसह अनेक शेतकरी नेत्यांविरुद्ध FIR दाखल, 200 जणांना घेतले ताब्यात)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनीही असा दावा केला होता की, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकर्‍यांच्या प्रस्तावित ट्रॅक्टर परेडमध्ये व्यत्यय आणण्यासाठी पाकिस्तानकडून 300 हून अधिक ट्विटर अकाउंट तयार केली गेली आहेत.