Delhi Violence: दिल्लीत घडलेल्या हिंसाचार प्रकरणी योगेंद्र यादवसह अनेक शेतकरी नेत्यांविरुद्ध FIR दाखल, 200 जणांना घेतले ताब्यात

असे सांगितले जात आहे की पोलिसांनी आतापर्यंत 200 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर हिंसाचार करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पोलिसांना जखमी केल्याचा आरोप आहे

BKU Spokesperson Rakesh Tikait. (Photo Credits: ANI)

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी) ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Tractor Rally) झालेल्या हिंसाचाराबद्दल (Violence) दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव आणि राकेश तिकट यांची नावे आहेत. याशिवाय सरवन सिंह पंढेर, सतनाम सिंह पन्नू यांची नावेही एफआयआरमध्ये आहेत. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि पंजाबमधील गुंड लखबीरसिंग उर्फ ​​लक्खा सिधाना हेही दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. या हिंसाचारात 300 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत व पोलिसांनी आतापर्यंत 22 एफआयआर नोंदवल्या आहेत.

शेतकरी नेत्यांविरोधात अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे सांगितले जात आहे की पोलिसांनी आतापर्यंत 200 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर हिंसाचार करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पोलिसांना जखमी केल्याचा आरोप आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांकडून पूर्ण अहवाल घेतला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांबाबत गेले 60 दिवस प्रदर्शन करत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढला होता. परंतु शेतकरी नेत्यांनी आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गावर हे प्रर्दशन झाले नाही.

मंगळवारी देशाच्या राजधानीत अनेक भागात किसान परेड दरम्यान आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिस कर्मचार्‍यांमध्ये तीव्र हिंसाचार झाला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकर्‍यांवर अश्रुधुर सोडले होते. यावेळी, आयटीओमार्गे काही शेतकरी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचले. तेथे शेतकऱ्यांनी तोडफोड केली आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, निदर्शकांनी आठ बस आणि 17 खासगी वाहनांचे नुकसान केले आहे. या निदर्शनात 300 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. (हेही वाचा: Farmers Protest: शेतकरी आंदोलनात फूट; VM Singh, Bhanu संघटनेची आंदोलनातून तात्काळ माघार घेत असल्याची घोषणा)

दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, लाल किल्ल्यातील हिंसाचाराची दिल्लीची स्पेशल सेल चौकशी करेल. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर बांधल्या गेलेल्या ध्वजस्तंभावर एक विशिष्ट धर्म आणि शेतकरी संघटनेचा झेंडा फडकवला होता. याच ठिकाणी पंतप्रधान दरवर्षी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतात.