Infectious Diseases Delhi: राज्यात 2023 मध्ये 24% मृत्यू संसर्गजन्य रोगांमुळे; दिल्ली सरकारचा अहवाल
वयानुसार मृत्यूदर आणि बालमृत्यूच्या कारणांचेही विश्लेषण करण्यात आले.
सन 2023 मध्ये राजधानीत नोंदवलेल्या 89,000 मृत्यूंपैकी सुमारे 24% मृत्यू (Mortality Rate,) हे कॉलरा (Cholera), क्षयरोग (Tuberculosis), हिपॅटायटीस बी (Hepatitis B) आणि अतिसार (Diarrheal) रोगांसह संसर्गजन्य आणि परजीवी रोगांमुळे झाले आहे, अशी धक्कादायक आकडेवारी दिल्ली सरकारच्या एका अहवालात (Delhi Government Report) अधोरेखीत करण्यात आली आहे. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाने जारी केलेल्या मृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणीकरण (MCCD) अहवाल 2023 मध्ये हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या आकडेवारीमुळे विविध विभागांतून चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय, आरोग्य क्षेत्रात तातडीने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कर्करोगाशी संबंधित मृत्यूमध्ये 12% वाढ
दिल्ली सरकारच्या अहवालात नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, 88,628 संस्थात्मक मृत्यूंपैकी सुमारे 21,000 संसर्गजन्य आजारांमुळे झाले होते, जे राजधानीत सुरू असलेले सार्वजनिक आरोग्याचे आव्हान अधोरेखित करते. दरम्यान, 2023 मध्ये कर्करोगाशी संबंधित मृत्यू 6,054 नोंदवले गेले, जे मागील वर्षाच्या 5,409 च्या आकड्यापेक्षा सुमारे 12% वाढ दर्शवते. (हेही वाचा, Mobile Phones Ban In School: शालेय आवारात मोबाईल बंदी)
अर्भकमृत्यूची धक्कादायक कारणे
अर्भकांच्या मृत्यूच्या बाबतीत, अहवालात असे दिसून आले आहे की अर्भकांमध्ये मृत्यूची सर्वात सामान्य कारणे म्हणजे गर्भाची मंद वाढ, गर्भाचे कुपोषण आणि अपरिपक्वता (1,517 प्रकरणे), त्यानंतर न्यूमोनिया (1,373 प्रकरणे), सेप्टिसीमिया (1,109 प्रकरणे) आणि हायपोक्सिया (704 प्रकरणे)आणि जन्म श्वास गुदमरणे यासारख्या श्वसनविषयक समस्या आदी बाबी आहेत.
अहवालातील वय-निहाय आकडेवारी सूचित करते की संस्थात्मक मृत्यूची सर्वाधिक संख्या 45 ते 64 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये झाली, या वयोगटातील 28,611 मृत्यू, एकूण मृत्यूंपैकी 32.28% दर्शवितात. त्यानंतर 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये 26,096 मृत्यू झाले, जे नोंदवलेल्या सर्व मृत्यूंपैकी 29.44% आहेत. दिल्ली सरकारचा अहवाल शहरातील प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि संसर्गजन्य रोग नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या तातडीच्या गरजेवर प्रकाश टाकतो.