Ayodhya Deepotsav : 5.51 लाख दिव्यांच्या रोषणाईत उजळली अयोध्या; योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पार पडला विश्वविक्रमी उपक्रम (Watch Video)
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या उपस्थितीत साडे पाच लाखाहून अधिक दीप प्रज्वलित करून राम की पैदी याठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली.
काल 25 ऑक्टोबर पासून देशभरात दिवाळी (Diwali 2019) च्या सणाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आज लक्ष्मीपूजन पूर्व दिनी छोटी दिवाळी (Choti Diwali) साजरी केली जात आहे. दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम (Shree Ram) रावणाचा (Ravan) वध करून अयोध्या (Ayodhya) नगरीत परतले होते. या आनंदाच्या निमित्त घरोघरी दिव्यांची आरास करून रोषणाई केली जाते. हीच परंपरा पुढे नेत आज अयोध्येत "दीपोत्सव"(Deepotsav) विश्वविक्रमी (World Record) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या उपस्थितीत साडे पाच लाखाहून अधिक दीप प्रज्वलित करून राम की पैदी याठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली. यासोबतच आदित्यनाथ यांनी यूपीतील जनतेसाठी 226 कोटींच्या योजनांची घोषणा सुद्धा याच कार्यक्रमात केली.
प्राप्त माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी युपीच्या गव्हर्नर आनंदीबेन पटेल, रिपब्लिक ऑफ फिजी चे डेप्यूटी स्पीकर वीणा भटनागर, अन्य मंत्री मंडळी आणि स्वतः योगी आदित्यनाथ उपस्थित होते. आज सकाळपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सर्वात आधी साकेत कॉलेज येथून प्रभू रामाचे रूप घेऊन आलेल्या कलाकारांनी मिरवणूक काढली होती. ज्यांनंतर दुपारच्या सुमारास रामलीला सादर करण्यात आली. या कार्यक्रमात तब्बल 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर संध्याकाळी 6 नंतर शरयू घाटावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.
अयोध्येच्या दीपोत्सवाची झलक
या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी भाषण करत दीपोत्सव सोहळ्याचे कौतुक केले. आता देशात राम्राज्यच सुरु आहे असे म्हणत त्यांनी केंद्रीय योजनांच्या यशाविषयी माहिती दिली. तसेच आजवर स्वातंत्र्यता नंतर पहिल्यांदाच 70 वर्षात आज हा सोहळा साजरा होत आहे, वास्तविक हे या आधीच होणे गरजेचे होते मात्र पूर्व सरकारने असे केले नाही असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला होता.