Mucormycosis ला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना निर्देश, सर्व प्रकरणांचा अहवाल देण्याच्याही सूचना
यासह अशा सर्व प्रकरणांचा केंद्राला अहवाल द्यावा असेही सांगण्यात आले आहे. याचा अर्थ, काळ्या बुरशीच्या सर्व पुष्टी झालेल्या आणि संशयित प्रकरणांची नोंद आरोग्य मंत्रालयाकडे केली जाईल
सध्या कोविड-19 (Coronavirus) च्या दुसर्या लाटेदरम्यान रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र दुसरीकडे रुग्णांमध्ये काळी बुरशी किंवा म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) हा आजार दिसून येत आहे. जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये हा आजार फोफावत आहे. स्टिरॉइड्सच्या सेवनामुळे हा रोग होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा बुरशीजन्य संसर्ग मेंदू, फुफ्फुस आणि 'सायनस' वर परिणाम करत आहे. तसेच मधुमेह रूग्ण आणि दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी तो घातकही ठरू शकते. म्हणूनच आता महामारी रोग अधिनियम 1897 अंतर्गत म्यूकोरमायकोसिसला अधिसूचित करा, असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे.
अशा परिस्थितीत, केंद्र सरकारने राज्य सरकारांना साथीच्या रोगाच्या कायद्यांतर्गत काळ्या बुरशीला अधिसूचित करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. यासह अशा सर्व प्रकरणांचा केंद्राला अहवाल द्यावा असेही सांगण्यात आले आहे. याचा अर्थ, काळ्या बुरशीच्या सर्व पुष्टी झालेल्या आणि संशयित प्रकरणांची नोंद आरोग्य मंत्रालयाकडे केली जाईल. कोरोनामधून बरे झालेले रुग्ण काळ्या बुरशीला बळी पडत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी राज्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना काळ्या बुरशीची तपासणी, निदान आणि व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
यापूर्वी, राजस्थान, तेलंगणाने ब्लॅक फंगसला साथीच्या कायद्यानुसार अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे. तामिळनाडूने आपल्या सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत या आजाराला अधिसूचित केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकार एलएनजेपी, आरजीएसएसएच, जीटीबी रुग्णालयात काळ्या बुरशीच्या उपचारासाठी विशेष केंद्रे स्थापित करेल. एकट्या महाराष्ट्रात आतापर्यंत काळ्या बुरशीचे 1500 रुग्ण आढळले आहेत आणि 90 लोकांचा बळी गेला आहे. (हेही वाचा: म्युकरमायकोसीस आजारावरील उपचारांसाठी केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे- राजेश टोपे)
दरम्यान, या रोगाशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान मोदींकडे Amphotericin-B च्या 2 लाख वायल्सची मागणी केली होती. मात्र, आतापर्यंत राज्याला केवळ 15-16 हजार डोस मिळाले आहेत. राज्यात म्यूकोरमायकोसिस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार होतील.