सिंगल डोसच्या Sputnik Light लसीला DCGI कडून आपत्कालीन वापरास मान्यता; जाणून घ्या किंमत
रशियन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या चाचणी टप्प्यात 7,000 हून अधिक लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात आले
कोरोना विषाणूविरुद्ध (Coronavirus) सुरू असलेल्या लढाईत लसीकरण (Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. यामध्ये देशाला आणखी एक नवीन शस्त्र मिळाले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सिंगल-डोस स्पुतनिक लाइट कोविड-19 लस (Sputnik Light Covid-19 Vaccine) आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे. डीजीसीआयने स्पुतनिक लाइट सिंगल डोस लसीला मान्यता दिल्यानंतर आता भारतात वापरासाठी मंजूर झालेल्या लसींची संख्या नऊ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले की, DGCI ने भारतात आपत्कालीन वापरासाठी स्पुतनिक लाईट कोविड-19 लस मंजूर केली आहे आणि यामुळे साथीच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला आणखी बळ मिळेल. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजच्या मते, स्पुतनिक लाiईटला अर्जेंटिना आणि रशियासह 29 देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलच्या विषय तज्ञांनी देशात वापरण्यासाठी सिंगल डोस लसीची शिफारस केली होती.
ही लस 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 पर्यंत लोकांना दिली गेली. यामध्ये लोकांना लस दिल्यानंतर 18 दिवसांनी डेटा गोळा करण्यात आला. स्पुतनिक लाइट व्हर्जन कोरोना विषाणूविरूद्ध 79.4% प्रभावी असल्याचे आढळले आहे. त्याची किंमत $10 पेक्षा कमी म्हणजे सुमारे 730 रुपये आहे. ही लस मॉस्कोमधील गमलेया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने विकसित केली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्पुतनिक लाईटचा वापर फायद्याचा ठरेल. याचा फायदा भारतासह अशा सर्व देशांना होऊ शकतो, जिथे संसर्ग वेगाने पसरत आहे. (हेही वाचा: Coronavirus: पूर्णपणे लसीकरण झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी, शासकीय आकडेवारीच्या आधारावर ICMR चा दावा)
या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा रशिया व्यतिरिक्त, संयुक्त अरब अमिराती, घानासह अनेक देशांमध्ये पार पडला. रशियन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या चाचणी टप्प्यात 7,000 हून अधिक लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्पुतनिक लाइट सिंगल-डोज लस आधी, कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन, कोवोव्हॅक्स तसेच कोबावॅक्स, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि जी-कोव्ह-डी लस देशात मंजूर झाली आहे.