देशाला चक्रीवादळाचा धोका; 'या' भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
एकीकडे देश कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत असताना, दुसरीकडे हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, येत्या तीन दिवसांत मोठे चक्रीवादळ (Cyclonic Storm) ‘अम्फान’ येण्याची शक्यता आहे. परिणामी ओडिशा आणि बंगालमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) होण्याची शक्यता आहे. 16 मे च्या संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ प्रभावीत होऊ शकते.
एएनआय ट्वीट -
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, जर हे वादळ विकसित झाले तर ते 17 मे रोजी प्रथम उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेने जाईल आणि नंतर ते उत्तर-पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात चक्रीवादळाच्या दिशेचा अधिक अचूक अंदाज बांधला जाईल.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, 16 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे केरळलाही येलो इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने सांगितले की, वादळाची 17 मेपर्यंत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ 18 -19 मे रोजी उत्तर-पूर्व दिशेला बंगालच्या उपसागराकडे जाईल. यामुळे ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार ते अगदी मुसळधार पाऊस पडेल. यावेळी वारा वेग देखील 60-70 किमी प्रतितास राहील. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 19 मे रोजी काही ठिकाणी मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: कृषि इन्फ्रास्ट्रक्चर, फूड प्रोसेसिंस, फिशरीज, पशुपालन, हर्बल शेती, ऑपरेशन ग्रीन यांसह अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे)
या चक्रीवादळामुळे दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्किम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू-काश्मीर, लडाख , राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने मच्छीमारांना 15 मेपासून दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. या भागात समुद्राकिनारी राहणाऱ्या लोकांनाही दूर जाण्यास सांगितले आहे.