Michaung Cyclone: मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ (Michaung Cyclone) तयार झाल्याने तामिळनाडू (Tamilnadu) आणि आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पावसामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चैन्नईमध्ये तर पुराच्या पाण्यामुळे जनजीवन ठप्प केले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा ही बंद करण्यात आहे.  दरम्यान, मिचौंगचा धोका आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  स्कायमेटच्या (Skymate) अंदाजानुसार, येत्या 24 तासांत मिचौंग चक्रीवादळ आणखी उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.  (हेही वाचा - Cyclone Michaung Updates: मिचॉंग चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात पोहोचण्याची शक्यता, IMD ने वर्तवली चार राज्यांमध्ये पावसाचा अंदाज)

दरम्यान मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढलेली पिके झाकून ठेवावीत असा, सल्लाही देण्यात आला आहे.  मिचौंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांवरही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.