Cyclone Fengal Nears Tamil Nadu: तामिळनाडूच्या समुद्रात 'फेंगल' चक्रीवादळ; आयएमडीनेकडून सावधानतेचा इशारा, समुद्र किनारपट्टी भागातील शाळा बंद
आयएमडीने रेड अलर्ट जारी केला; प्रभावित भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण झाला आहे.
School Closures Tamil Nadu: भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ फेंगल (Cyclone Fengal) तीव्र होत असल्याने इशारा जारी केला आहे. समुद्रात खोल दाबाचा पट्टा म्हणून निर्माण झालेली ही प्रणाली आता तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, ज्याचा येत्या काही दिवसांत गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामन विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ आज (27 नोव्हेंबर) चेन्नईच्या दक्षिण-आग्नेयेला सुमारे 770 किमी आणि श्रीलंकेतील त्रिंकोमालीच्या पूर्वेला 110 किमी अंतरावर होते. ते ताशी 10 किमी वेगाने उत्तर-वायव्येकडे सरकत आहे. या वादळामळे चेन्नईमध्ये पाऊस (Chennai Rainfall) पाहायला मिळत आहे.
आयएमडीच्या ताज्या माहितीनुसार हे वादळ "बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागातील खोल दाबाचे क्षेत्र पुढील सहा तासांत चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. ते उत्तर-वायव्येकडे सरकून श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून सरकून पुढील दोन दिवसांत तामिळनाडूकडे जाईल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा, Cyclone Dana Live Tracker: दाना चक्रीवादळाची स्थिती काय? लाइव्ह ट्रॅकर नकाशाद्वारे जाणून घ्या सध्यास्थिती)
आयएमडीचा इशारा आणि वादळप्रभावीत शहरे
रेड अलर्टः मयिलादुथुराई, नागपट्टिनम आणि कराईकल सारख्या जिल्ह्यांमध्ये 20.4 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑरेंज अलर्टः चेन्नई, विल्लुपुरम आणि पुडुचेरीमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मच्छीमारांसाठी सूचनाः बंगालच्या उपसागरातील सर्व प्रकारच्या मासेमारीस 28 नोव्हेंबरपर्यंत समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे बंदी आहे.
वादळाता परिणाम
या वादळाचा सामान्य जनजीवनावरही परिणाम झाला आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन किनारपट्टीलगतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूतील अधिकाऱ्यांनी चेन्नई, चेंगलपट्टू, कुड्डालोर आणि मयिलादुथुराई येथील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. पुद्दुचेरी आणि कराईकलने सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व वर्ग स्थगित केले आहेत.
वाहतूक आणि विमानसेवा विस्कळीत
मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये पाणी साचले असून जुन्या महाबलीपुरम रोडसारख्या प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई विमानतळाने किमान सात उड्डाणांना विलंब झाल्याची नोंद केली. मात्र, दूध वितरणासारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही.
चेन्नईमध्ये दमदार पाऊस, वादळाचा परिणाम
मदत आणि आपत्कालीन उपाययोजना
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना तयारीस प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि सखल भागातील असुरक्षित रहिवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि वैद्यकीय विभाग हाय अलर्टवर आहेत. "फंगल चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामाचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य पूर्णपणे तयार आहे. सार्वजनिक सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले.