Cross-Border Love Story: सीमा हैदरनंतर आता दक्षिण कोरियाची मुलगी आली भारतात; उत्तर प्रदेशातील प्रियकराशी केले लग्न
तो देश त्याला इतका आवडला की त्याने तिथेच राहायचा निर्णय घेतला आणि उदरनिर्वाहासाठी सायबर कॅफेमध्ये नोकरी मिळवली. किमही याच सायबर कॅफेमध्ये काम करत होती.
पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू यांच्या चर्चेदरम्यान, आता आपल्या प्रेमासाठी दक्षिण कोरियाच्या (South Korean) तरुणीने उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर गाठले आहे. इतकेच नाही तर या तरुणीने आपल्या भारतीय प्रियकराशी लग्नही केले आहे. या तरुणीचे नाव किम बोह नी असून ती 30 वर्षांची आहे. किम ही डेगू, दक्षिण कोरियाची रहिवासी आहे. सीमा हैदर आणि अंजूपेक्षा किमची कहाणी थोडी वेगळी आहे. शाहजहांपूरच्या पुवायन भागात असलेल्या उधना गावातील सुखजीत सिंग आणि किम हे सहा वर्षांपूर्वी एकमेकांच्या संपर्कात आले होते. आता 18 ऑगस्ट रोजी किम आणि सिंग यांनी गुरुद्वारामध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नात वधू-वर दोघांच्या कुटुंबीयांची संमती होती.
किमने सोमवारी 'पीटीआय-भाषा'शी केलेल्या संभाषणात सांगितले की, तिला भारतात येऊन खूप आनंद होत आहे आणि तिला तिच्या सासरकडून खूप प्रेम मिळत आहे. किमने सांगितले की, सध्या फक्त भाषेची समस्या तिला भेडसावत आहे. या संभाषणादरम्यान, किमचा पती सुखजित सिंग देखील उपस्थित होता, ज्याने दुभाष्याची भूमिका बजावली. किमची दक्षिण कोरियन भाषा भाषांतरित करून ती समजून सांगण्यास सुखजित मदत करतो.
किम म्हणाली की, भारताची संस्कृती आणि समृद्ध चालीरीतींचा तिच्यावर खूप प्रभाव आहे आणि त्या ती स्वतःमध्ये रुजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतात येण्यापूर्वी तिच्या मनात अनेक शंका होत्या, पण भारतात आल्यानंतर तिच्या लक्षात आले की, येथील लोक खूप चांगले आहेत. किमने सांगितले की तिला भारतीय जेवण आणि कपडे खूप आवडतात.
सुखजीत याने सांगितले की, तो 2016 मध्ये दक्षिण कोरियाला भेट देण्यासाठी गेला होता. तो देश त्याला इतका आवडला की त्याने तिथेच राहायचा निर्णय घेतला आणि उदरनिर्वाहासाठी सायबर कॅफेमध्ये नोकरी मिळवली. किमही याच सायबर कॅफेमध्ये काम करत होती. पुढे 2017 मध्ये दोघांमध्ये मैत्री झाली जी नंतर प्रेमात बदलली. जवळपास सहा वर्षे चाललेल्या या नात्यानंतर दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. सुखजीत आणि किमच्या कुटुंबानेही या लग्नाला परवानगी दिली. दोघांनीही गुरुद्वारामध्ये पंजाबी रीतिरिवाजानुसार लग्न केले. भारताने किमला पाच वर्षांचा व्हिसा दिला आहे. तीन महिन्यांसाठी ती इथे आली आहे.