COVID-19 Vaccine Update: Covavax लसीच्या लहान मुलांवरील चाचण्यांसाठी Serum Institute ला परवानगी न देण्याची तज्ञांची शिफारस
नोव्होव्हॅक्स च्या कोव्होव्हॅक्स कोविड-19 लसीच्या लहान मुलांवरील चाचण्यांना परवानगी देऊ नका, असे तज्ञ समितीकडून सांगण्यात आले आहे.
नोव्होव्हॅक्स (Novavax) च्या कोव्होव्हॅक्स (Covavax) कोविड-19 लसीच्या (Covid-19 Vaccine) लहान मुलांवरील चाचण्यांसाठी सीरम इंस्टीट्यूटला परवानगी देऊ नका, असे तज्ञ समितीकडून सांगण्यात आले आहे. सीरम इंस्टीट्यूट (Serum Institute) 2-17 वयोगटातील लहान मुलांवर कोव्होहॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला (Clinical Trials) परवानगी नाकारण्यात आली असून त्यांना प्रथम प्रौढांवरील ट्रायल्सचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
सीरम इंस्टीट्यूटने सोमवारी लहान मुलांवरील ट्रायल्ससाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली होती. या ट्रायल्स 10 साईट्सवर करण्यात येणार होत्या. मात्र सीरम इंस्टीट्यूटला मुलांवरील ट्रायल्ससाठी परवानगी न देण्याचे तज्ञ समितीने सुचवले आहे. तसंच लहान मुलांवर ट्रायल्स सुरु करण्यापूर्वी कोव्होव्हॅक्स लसीच्या प्रौढांवरील ट्रायल्सचे रिपोर्ट सादर करण्यास सीरम इंस्टीट्यूटला सांगण्यात आल्याची माहिती सुत्रांनी एएनआयला (ANI) दिली आहे.
ANI Tweet:
अमेरिकेतील लस निर्माते Novavax च्या कोव्होव्हॅस लसीच्या ट्रायल्स लवकरच भारतात सुरु होतील आणि सप्टेंबर महिन्यात लस लॉन्च होईल, असे सीरम इंस्टीट्यूट चे सीईओ अदर पुनावाला यांनी मार्च महिन्यात सांगितले होते. (Covid-19 Vaccine Update: देशात Sputnik V लसीचे उत्पादन ऑगस्ट महिन्यापासून सुरु)
दरम्यान, AIIMS ने कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील ट्रायल्स सुरु केल्या असून 12-18 मुलांवर एका डोसच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत मे महिन्यात फायझर कोविड-19 लसीला लहान मुलांवरील वापरासाठी मान्यता मिळाली आहे.