COVID-19 Vaccine Update: भारत बायोटेक विकसित Covaxin लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला आजपासून सुरुवात

आयसीएमआरकडून रुग्णालयाला ट्रायल्ससाठी परवानगी देण्यात आली आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोविड-19  वरील लस Covaxin च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स आजपासून बंगळुरु (Bengaluru) येथील एका खाजगी रुग्णालयात सुरु होणार आहेत. हैद्राबाद स्थित भारत बायोटेक (Bharat Biotech) यांनी विकसित केलेली लस Covaxin च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्ससाठी आयसीएमआरने (ICMR) आमच्या हॉस्पिटलला परवानगी दिल्याची माहिती व्यादेही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे (Vydehi Institute of Medical Sciences and Research Centre) अधिकारी के. रवि बाबू (K. Ravi Babu) यांनी आयएएनएसला दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स मध्ये तब्बल 1000 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ही लस स्वयंसेवकांना दोन डोसेसमध्ये देण्यात येईल. पहिला डोस आज देण्यात येईल. तर दुसरा डोस 30 डिसेंबर रोजी देण्यात येईल, असे रवी बाबू यांनी सांगितले. मात्र यासाठी स्वयंसेवकांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही. फोन किंवा व्हिडिओ कॉल द्वारे त्यांचे अपडेट्स, प्रतिक्रीया जाणून घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रवी बाबू यांनी पुढे सांगितले की, स्वयंसेवकांमध्ये 18 वर्षांपुढील पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. ही लस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असल्याने ज्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आहे आणि ज्यांच्यात कोणतेही लक्षणे नाहीत, अशाच व्यक्तींना लस देण्यात येईल. ट्रायल्सचा डेटा राज्यातील Drugs Controller General of India च्या टीमकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Sputnik V Vaccine Update: भारतामध्ये HETERO सोबत RDIF करणार कोविड 19 वरील लसीचं उत्पादन)

कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी बायोटेक वैज्ञानिकांशी आणि चाचण्यांचे निकाल देणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमशी चर्चा केली असून आज ते ट्रायल्स लॉन्च करतील. आरोग्यमंत्री आणि डॉक्टर सुधाकर म्हणाले की, चाचण्यांमुळे जानेवारीमध्ये लसीची कार्यक्षमता पातळी कळेल आणि येत्या काही महिन्यांत जास्तीत जास्त लोकांना रोगप्रतिबंधक लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येईल.

सरकारी धोरणानुसार, कोरोना योद्धा, डॉक्टर्स, आरोग्य सेवक यांना सर्वप्रथम लस देण्यात येईल. दक्षिणेकडील राज्यांमध्ये यांच्या संख्या सुमारे 5 लाख इतकी आहे, असे सुधाकर यांनी सांगितले. तसंच वृद्धांना लस देण्याकडे प्राधान्य असेल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.