COVID-19 Vaccination In India Revised Guidelines: भारत सरकार कडून 21 जून पासून सुरू होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम; नवी नियमावली जारी

यासाठीची नियमावली जारी करताना कोणाला, कशी, कुठे मिळणार याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सविस्तर दिली आहे.

Covid-19 Vaccination | Representational Image | (Photo Credits: IANS|File)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांवरील सार्‍यांना मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर 24 तासांच्या आतमध्येच आज, 8 जून दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम (National COVID Vaccination Program)जारी केला आहे. आता देशामध्ये 21 जून पासून सार्‍यांना लस केंद्राकडून पुरवली आणि दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे असलेला 25% लसीकरणाचा भार आता कमी होणार आहे. केंद्र सरकार 75% लसी या लस उत्पादकांकडून  घेऊन देशात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवणार आहे. लसी या राज्यांना प्रत्येक राज्यातील कोविड रूग्णसंख्येचा भार, लसीकरणाचा वेग आणि लोकसंख्या यांच्या आधारे पुरवल्या जाणार आहेत. (नक्की वाचा: COVID19 Vaccination संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे तुम्हाला येथे मिळतील फक्त एका क्लिकवर).

दरम्यान राष्ट्रीय कोवीड लसीकरण कार्यक्रमामध्ये प्राधान्य हे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, 45 वर्षांवरील नागरिक, दुसरा डोस जवळ आलेले आणि नंतर 18-44 वयोगटातील नागरिक असे असणार आहे. या लसीकरणामध्ये नागरिकांचा आर्थिक स्तर काहीही असला तरीही लस केंद्र सरकारकडून मोफत दिली जाणार पण आर्थिक क्षमता असल्यास खाजगी केंद्रांवर लस घेण्याचेही नागरिकांना आवाहन केले आहे. त्यासाठी कमाल 150रूपये प्रति डोस असा सर्व्हिस चार्ज मोजता येऊ शकतो.

इथे पहा सविस्तर नियमावली

दरम्यान महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 44 लाख 11 हजार 349 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून 7 जून 2021 रोजी 2,93,984 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. अशी माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राने सार्‍यांचे लसीकरण मोफत करण्याच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. राज्यात सध्या लसींच्या तुटवड्यामुळे 18-44 वयोगटातील नागरिकांच्या सरकारी केंद्रावरील लसीकरण थांबवण्यात आले आहे.