Covid-19 Restrictions: देशातील कोरोना विषाणू निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय; सणासुदीच्या काळात खबरदारी घेण्याचे आवाहन
बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोविड-19 प्रोटोकॉल म्हणजेच देशातील कोरोना निर्बंध (Covid-19 Restrictions) 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोविड-19 प्रोटोकॉल म्हणजेच देशातील कोरोना निर्बंध (Covid-19 Restrictions) 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत कोरोना नियम लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता ते आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आले आहेत. ज्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होत आहेत, अशा कार्यक्रमांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात यावी, जेणेकरून कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यता टाळता येईल असे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक जिल्ह्यात संसर्ग दर, रुग्णालयाची स्थिती आणि आयसीयू बेडची उपलब्धता यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी रुग्णांची वाढ रोखण्यासाठी कृतिशील उपाययोजना कराव्यात, असेही निर्देशात म्हटले आहे. यासोबतच, सरकारने 'टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण' आणि कोविड योग्य वर्तनाच्या पाच-सूत्रीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
एकीकडे देशात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत असतानाच दुसरीकडे जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा थैमान घातले आहे. ब्रिटनमध्ये, एका दिवसात 40 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. बहुतेक प्रकरणे कोरोनाच्या डेल्टा प्रकारातील आहेत. रशियातही अशीच परिस्थिती आहे. रशियामध्ये मृत्यूची संख्या दररोज 1000 पेक्षा जास्त झाली आहे. ज्या चीनमधून कोरोना विषाणू बाहेर पडल्याचा दावा करण्यात आला होता त्या चीनमध्येही व्हायरसने पुनरागमन केले आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा: COVAXIN Update: WHO कडून Bharat Biotech च्या 'कोवॅक्सिन' ला आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अजून कागदपत्रं सादर करण्याची गरज)
भारतात कोरोना संसर्गाची दररोज सरासरी 16-17 हजार प्रकरणे समोर येत आहेत. भारतात आतापर्यंत 3,36,14,434 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी 4,56,386 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी 1.33 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.