Covid-19: हवेत सापडलेले कोरोना व्हायरसचे कण पसरवू शकतात संसर्ग; अभ्यासात खुलासा

अशा ठिकाणी दोन किंवा अधिक कोविड रुग्ण एकत्र असल्यास हवेतील संसर्गाचे प्रमाण 75 टक्के असू शकते

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी झुंज देत दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाचा प्रभाव, त्याचा प्रसार आणि त्याची पाळेमुळे समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण कोरोनाशी संबंधित रहस्ये कांद्याच्या पापुद्र्यासारखी झाली आहे. रोज एक समोर येत आहे. याआधी असे मानले जात होते की कोरोना पृष्ठभागावरून पसरतो. नंतर एपिडेमियोलॉजिस्टना आढळले की ज्या देशांमध्ये लोक मास्क घालण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करतात त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होतो. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना विषाणूचे कण हवेतून पसरत असल्याबाबत फारसे पुरावे मिळाले नाहीत. पण आता एका अभ्यासात या विषाणूचा प्रसार हवेतून होत असल्याची पुष्टी झाली आहे.

सीएसआयआर-सीसीएमबी (CSIR-CCMB), हैदराबाद आणि सीएसआयआर-आयएमटेक (CSIR-IMTech) चंदीगडच्या शास्त्रज्ञांच्या गटाने संयुक्तपणे एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास हैदराबाद आणि मोहाली येथील रुग्णालयांमध्ये करण्यात आला. जेथे SARS-CoV 2 च्या हवेतून प्रसाराची पुष्टी झाली आहे. हे संशोधन जर्नल ऑफ एरोसोल सायन्समध्ये प्रकाशित झाले आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी जिथे कोविड-19 च्या रुग्णांनी काही काळ घालवला होता अशा ठिकाणच्या हवेचे नमुने घेऊन कोरोना विषाणूच्या जीनोमचे विश्लेषण केले. उदाहरणार्थ, रूग्णालये, बंद खोल्या जेथे रूग्ण काही काळ थांबला होता किंवा राहिला होता.

अभ्यासात असे आढळून आले की, कोविडचे रुग्ण जेथे उपस्थित होते त्या आसपासच्या हवेत विषाणू आढळू शकतात, इतकेच नाही तर ज्या ठिकाणी रुग्ण उपस्थित होते तेथे सकारात्मकतेचे प्रमाणही जास्त होते. हे विषाणू रुग्णालयाच्या आयसीयू आणि नॉन-आयसीयू वॉर्डांमध्ये असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासात असे आढळून आले की, हवेत एक जिवंत विषाणू आहे जो कोणत्याही जिवंत पेशीला संक्रमित करू शकतो आणि लांब अंतरावर पसरू शकतो. (हेही वाचा: देशात पहिल्या कोरोनाच्या 'एक्सई व्हेरिएंट'ची पुष्टी; BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य)

या अभ्यासाशी निगडित शास्त्रज्ञ शिवरंजनी मोहिरर म्हणतात की, आमचे परिणाम असे दर्शवतात की कोरोना व्हायरस काही काळ बंद ठिकाणी राहू शकतो. अशा ठिकाणी दोन किंवा अधिक कोविड रुग्ण एकत्र असल्यास हवेतील संसर्गाचे प्रमाण 75 टक्के असू शकते. दुसरीकडे, त्या जागी एक रुग्ण किंवा कोणताही रुग्ण उपस्थित नसल्यास, संसर्ग दर 15.8 टक्के राहतो.