Covid-19 4th Wave: 'देशात स्थानिक पातळीवर कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मात्र चौथ्या लाटेची शक्यता नाही'- ICMR
आयसीएमआरने सांगितले देशभरात रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चौथी लाट सूचित करणारे कोणतेही नवीन प्रकार आतापर्यंत आढळले नाहीत
गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्रातही कोविड-19 चे रुग्ण वाढत राहिल्यास मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे संकेत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिले. देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे अतिरिक्त महासंचालक समीरन पांडा म्हणाले की, भारतात कोविड-19 च्या रोजच्या घटनांना कोरोनाची चौथी लाट म्हणता येणार नाही.
रविवारी IANS शी बोलताना समीरन पांडा म्हणाले की, कोरोनाची वाढती प्रकरणे जिल्हा स्तरावर दिसत आहेत, त्यामुळे देश चौथ्या लाटेकडे जात आहे असे म्हणता येणार नाही. ते म्हणाले, जिल्हा स्तरावर कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढीला ब्लीप म्हणतात. ब्लिपचा अर्थ तात्पुरती समस्या आहे. ही वाढती प्रकारेण चौथ्या लाटेचे लक्षण का नाही हे स्पष्ट करताना पांडा म्हणाले की आपण जे पाहत आहोत तो एक झटका आहे, परंतु त्यामुळे संपूर्ण राज्य कोविडच्या विळख्यात आहे असे आपण म्हणू शकत नाही.
ते पुढे म्हणाले, देशभरात रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चौथी लाट सूचित करणारे कोणतेही नवीन प्रकार आतापर्यंत आढळले नाहीत. दुसरीकडे राजेश टोपे आज म्हणाले, ‘कोविड 19 ची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्हाला मास्क घालणे अनिवार्य करावे लागेल. आमचे उद्दिष्ट लसीकरणाला गती देणे आहे आणि मुलांचे लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जातील.’ (हेही वाचा: देशात आतापर्यंत एकूण 188 कोटी 70 लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण पूर्ण)
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली यामध्ये राज्य आणि उत्तर भारतात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा अनिवार्य करावे की नाही यावर चर्चा झाली. कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होऊनही, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गुरुवारी राज्यात मास्क वापरणे अनिवार्य न करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून मास्क वापरण्याचे नियम ऐच्छिक बनवून शिथिल केले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी, 30 एप्रिल रोजी 155 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदव ली गेली, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 998 वर पोहोचली. याशिवाय, दिवसभरात 1 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली, ज्यामुळे मृतांची संख्या 1,47,843 वर पोहोचली. दिवसभरात 135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, अशा रुग्णांची संख्या 77,28,891 झाली आहे. राज्यातील रिकव्हरी दर 98.11% आहे व राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.87% आहे.