Cough Syrups Advisory: कफ सिरप आता थेट मेडिकलवर मिळणार नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत कफ सिरपसह सर्व प्रकारच्या 'सिरप'ची थेट विक्री (ओव्हर द काउंटर) बंद केली आहे. आता औषध दुकानांमधून सिरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे अधिकृत प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करण्यात आले आहे.

Cough Syrup (PC- Pixabay)

देशातील औषध विक्री आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, अबालवृद्धांसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपसह सर्व प्रकारच्या द्रव स्वरूपातील औषधांची (सिरप) थेट काउंटरवरून होणारी विक्री बंद करण्यात आली आहे. या नवीन नियमामुळे ग्राहकांना आता कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) सिरप खरेदी करता येणार नाही.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, औषध नियम १९४५ मधील 'शेड्यूल के' (Schedule K) मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी या शेड्यूलमधील तरतुदींनुसार कफ सिरप आणि काही सामान्य औषधांना प्रिस्क्रिप्शनच्या नियमांमधून सूट देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट मेडिकलमधून कफ सिरप खरेदी करत असत. मात्र, आता या विशेषाधिकार यादीतून 'सिरप' हा शब्द वगळण्यात आला असून, त्यांची विक्री पूर्णपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच करणे बंधनकारक केले आहे.

गेल्या काही काळापासून देशात आणि जागतिक स्तरावर दूषित कफ सिरपच्या वापरामुळे झालेल्या गंभीर दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. औषध नियंत्रण समितीच्या बैठकांमध्ये कफ सिरपमध्ये वापरल्या जाणाऱ्या डायइथिलीन ग्लायकोल (DEG) आणि इथिलीन ग्लायकोल (EG) यांसारख्या रासायनिक घटकांच्या दूषिततेवर वारंवार चिंता व्यक्त करण्यात आली होती. लहान मुलांच्या आरोग्याला असणारा हा संभाव्य आणि गंभीर धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक नागरिक सर्दी किंवा खोकला झाल्यास डॉक्टरांकडे न जाता स्वतःच्या मनानेच कफ सिरप विकत घेतात. अनेकदा या सिरपचा अतिवापर, चुकीचा डोस किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेले मिश्रण शरीरासाठी, विशेषतः लहान मुलांच्या मूत्रपिंडासाठी (किडनी) अत्यंत घातक ठरू शकते. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक स्वतःच्या मनाने औषधे घेण्याच्या (Self-Medication) प्रवृत्तीला आळा बसेल आणि औषधांच्या गैरवापरावर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे.

या अधिसूचनेची अंमलबजावणी देशभरातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांसाठी तात्काळ बंधनकारक करण्यात आली आहे. जर कोणत्याही मेडिकल स्टोअर चालकाने डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणत्याही सिरपची विक्री केली, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई आणि औषध विक्री परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. यासोबतच औषध उत्पादक कंपन्यांनाही आता कच्च्या मालाच्या आणि अंतिम उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत कडक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement