Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे जगात मंदी पण Indian Economy मात्र सुरक्षित - संयुक्त राष्ट्र

भारत आणि चीन अर्थव्यवस्था कोरोना संकटात नेमकी कोणत्या कारणामुळे धोकाविरहीत राहू शकेल याबात हा अहवाल काहीच सांगत नाही.

Economy | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे जगभरात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) आणि चीनी अर्थव्यवस्था या सावटापासून सुरक्षीत राहतील असा, अंदाज संयुक्त राष्ट्राने व्यक्त केला आहे. यूनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट (UNCTAD) ने कोरोना व्हायरस संकट आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा नुकताच एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल 'विकसनशील देशांना कोरोना व्हायरसचा झटका: भविष्यातील परिणाम' या नावाने प्रसिद्ध केला. या अहवालात भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेबाबत बरेच सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे.

या अहवालात यूएनसीटीएडीने म्हटले आहे की, 'कोरोना व्हायरस या साथीच्या संकटामुळे येणाऱ्या काळात जागतिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. यंदा जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होणार आहे. मात्र, असे असले तरी भारत आणि चीन हे दोन्ही देश आपल्या अर्थव्यवस्थेची झळाळी कायम ठेऊ शकतात. किंबहुना या दोन्ही देशांची आर्थिक झळाळी कायम राहू शकेल.' संयुक्त राष्ट्र संघाच्या या अहवालात म्हटले आहे की, जगातील दोन तृतियांश लोकसंख्याही विकसनशील देशांमध्ये राहते. या गंभीर अशा संकटाचा सामना या देशांना करावा लागू शकतो.संयुक्त राष्ट्रने या देशांना वाचविण्यासाठी ट्रिलियन डॉलर इतक्या आर्थिक पॅकेजचीही मागणी केली आहे.

UNCTAD ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कमोडिची क्षेत्रात विकसित देशांमध्ये गुंतवणुकीत दोन 2 ते 3 खरब डॉलर पर्यंत कमी येऊ शकते. या संकटाचा सामना करण्यासाठी चीनने विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. त्याचा या देशाला फायदा होऊ शकतो. संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, हे एक अर्थव्यवस्थेवर आलेले अप्रत्यक्ष संकट आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी उपाययोजनाही तितक्याच प्रभावी असायला हव्यात. (हेही वाचा, कोरोना व्हायरसमुळे येणारी आर्थिक मंदी ही 2009 पेक्षा भयानक असू शकते; IMF चीफ यांचा धोक्याचा इशारा)

UNCTAD ने आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी मंदी पाहायला मिळू शकते. जगभरातील अनेक देशांचे करोडो डॉलर्स बूड शकतात. विकसनशील राष्ट्रांवर हे संकट अधिक परिणामकारक ठरेल. दरम्यान, चीन आणि भारत मात्र या संकटातून वाचू शकतील. दरम्यान, चीन आणि भारताबाबत या अहवालात सकारात्मक लिहीले असले तरी, हे नेमक्या कोणत्या कारणामुळे घडू शकेल यावर मात्र विशेष भाष्य करण्यात आले नाही. भारत आणि चीन अर्थव्यवस्था कोरोना संकटात नेमकी कोणत्या कारणामुळे धोकाविरहीत राहू शकेल याबात हा अहवाल काहीच सांगत नाही.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जगभरामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे सुमारे 35,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात 7,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरस संकटामुळे मेटाकुटीला आले आहेत. आर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठाच परिणाम होताना पाहायला मिळत आहे.