Coronavirus Vaccination: देशात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त आजारी व्यक्तींना दिली जाणार कोरोना लस, सरकारी केंद्रांवर मिळणार मोफत  

लाभार्थ्यांमध्ये प्रथम डोस घेतलेले 64,71,047 आरोग्य कर्मचारी, दुसरा डोस घेतलेले 13,21,635 एचसीडब्ल्यू आणि कोविड-19 च्या विरुद्धच्या युद्धात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या 41,14,710 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

सध्या देशामध्ये कोरोना विषाणू लसीकरण (Coronavirus Vaccination) चालू आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सांगितले आहे की, कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होईल. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. याशिवाय अशा 45 वर्षांच्या लोकांनाही ही लस देण्यात येणार आहे ज्यांना आधीपासून कोणते आजार आहेत. ही लस केवळ सरकारी केंद्रांवरच मोफत दिली जाईल तर खासगी ठिकाणी यासाठी शुल्क आकारले जाईल. ही फी किती असेल हे एक-दोन दिवसात निश्चित होईल.

केंद्रीय मंत्री आणि भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या ब्रीफिंग दरम्यान हे सांगितले. त्यांनी अशी माहितीही दिली की, लस घेणारी सुमारे 10 कोटी माणसे आहेत आणि 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. जावडेकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि एकावर चर्चा झाली. देशाने कोरोनावर यशस्वी लढा दिला आहे आणि इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये मृत्यूही कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

एका अहवालानुसार मंगळवारपर्यंत एकूण 1,19,07,392 लसीचे डोस देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांमध्ये प्रथम डोस घेतलेले 64,71,047 आरोग्य कर्मचारी, दुसरा डोस घेतलेले 13,21,635 एचसीडब्ल्यू आणि कोविड-19 च्या विरुद्धच्या युद्धात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या 41,14,710 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की लसीकरण मोहिमेच्या 39 व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लसीकरणाच्या पहिल्या डोसशी संबंधित दुष्परिणामांची पाच प्रकरणे आणि लसीच्या दुसऱ्या डोसशी संबंधित तीन दुष्परिणामांची नोंद झाली आहे. (हेही वाचा: Coronavirus: केंद्राकडून राज्यांना COVID-19 Vaccination वाढविण्याच्या सूचना)

दरम्यान, गेल्या काही दिवसांत देशात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे, सरकार लसीकरणाला गती आणत आहे. वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार येत्या चार ते सहा आठवड्यांत लसीकरण दर पाच लाखांपर्यंत आणण्याचा विचार करीत आहे. 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे.