Covid-19 Vaccine Sputnik-V: दिलासादायक! भारतामध्ये रशियाच्या 'स्पुतनिक व्ही' लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

रेड्डी यांच्याबरोबर सप्टेंबर 2020 मध्ये या लसीसाठी भागीदारी केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाने स्पुतनिक-व्हीची नोंदणी केली होती. कोरोना लस बनविणारा हा पहिला देश होता. मात्र, या लसीची मोठ्या प्रमाणात ट्रायल सप्टेंबरमध्ये सुरू झाली

Sputnik V Vaccine (Photo Credits: File Image)

देशात कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) माजलेल्या गदारोळामध्ये एका दिलासादायक बाब समोर आली आहे. आता भारतात आणखी एक कोरोना विषाणू लस मंजूर झाली आहे. सोमवारी, लस प्रकरणातील विषय तज्ञ समितीने (SEC) रशियाच्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लसीला आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रायलचा डेटा स्पुतनिकने सादर केला आहे, ज्या आधारावर या लसीच्या वापरला मंजुरी मिळाली. लवकरच सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण मिळेल. भारतामध्ये स्पुतनिक व्ही हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबच्या सहकार्याने ट्रायल करत आहेत आणि त्यांच्यासोबतच याचे उत्पादनही चालू आहे. अशा परिस्थितीत ही लस मंजूर झाल्याने भारतात लसीच्या तुटवड्याबाबतच्या तक्रारी कमी होतील.

सेन्ट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ज्ञ समितीच्या मान्यतेनंतर, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) याबाबत अंतिम निर्णय घेईल. या लसीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर देशात तीन कोरोना लसी असतील. देशात अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोविशील्ड आणि भारत बायोटेक-आयसीएमआर लस कोव्हॅक्सिन यापूर्वीच मंजूर झाल्या आहेत आणि 100 दशलक्षपेक्षा जास्त लोकांना याचे डोस देण्यात आले आहेत. हैदराबाद येथील औषधनिर्माण संस्था डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने गेल्या आठवड्यात स्पुतनिक व्हीसाठी भारत सरकारची मंजुरी मागितली होती. (हेही वाचा: हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यातील दुसऱ्या शाही स्नानादरम्यान भाविकाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; पहा तुडूंब गर्दीचे फोटोज)

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डी यांच्याबरोबर सप्टेंबर 2020 मध्ये या लसीसाठी भागीदारी केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाने स्पुतनिक-व्हीची नोंदणी केली होती. कोरोना लस बनविणारा हा पहिला देश होता. मात्र, या लसीची मोठ्या प्रमाणात ट्रायल सप्टेंबरमध्ये सुरू झाली. रशियाची स्पुतनिक-व्ही ट्रायलमध्ये 91.6 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीच्या शेवटी भारतात आणखी पाच लस उपलब्ध असतील.