Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत 5 वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू; लॉक डाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता
याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लॉक डाऊनचा (Lockdown) मार्ग अवलंबला गेला व सध्या त्याची तिसरी फेज सुरु आहे.
भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणाने मोठी उसळी घेतली आहे. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लॉक डाऊनचा (Lockdown) मार्ग अवलंबला गेला व सध्या त्याची तिसरी फेज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्वाची बैठक चालू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मिटिंग चालू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या रणनीतीवर केंद्रित आहे. सध्याच्या तिसऱ्या लॉक डाऊनचा टप्पा 17 मे रोजी संपणार आहे, त्यानंतर जनजीवन कसे असेल यावर विचारविनिमय होत आहे.
एएनआय ट्विट -
सामाजिक अंतराच्या नियमांनुसार लॉकडाउन सुरू ठेवावे की त्यात शिथिलता आणावी, यावर ठोस निर्णय घेण्यासाठी पीएम मोदींनी राज्य मुख्यमंत्र्यांसमवेत ही बैठक आयोजित केली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाने (PMO) सर्व मुख्यमंत्र्यांना चर्चेत सहभागी होण्याचे व सूचना मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील या व्हिडिओ कॉन्फरन्सचा भाग आहेत. सर्व मुख्य मंत्र्यांसोबतची पंतप्रधानांची ही 5 वी बैठक आहे.
देशातील प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय रेल्वेला हळूहळू पुन्हा मार्गावर आणण्याची अनुमती देण्यात आली आहे. 12 मेपासून भारतीय रेल्वेच्या 15 गाड्या दिल्लीहून धावणार आहेत. यापुढील काळात गाड्यांची संख्या वाढवून सेवा पूर्ववत केल्या जातील, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे. यासाठी प्रवाशांना मात्र कठोर सामाजिकअंतराच्या निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे देशात काय काय आणि कोणत्या पद्धतीने सुरु करता येईल याबाबतचा निष्कर्ष सध्या चालू असलेल्या बैठकीमधून निघेल. (हेही वाचा: Coronavirus: पुण्यातील NIV ने विकसित केली Antibody Detection kit; अडीच तासांमध्ये होणार 90 नमुन्यांची चाचणी)
दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 4213 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,152 इतकी झाली आहे. यात सध्या 44,029 रुग्णांवर उपचार सुरु असून 20,917 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2206 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.