Coronavirus: आतापर्यंत 492 जणांचा मृत्यू, भारतातही कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढला

या जहाजातून तब्बल 3000 पेक्षाही अधिक प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

भारताचे शेजारी राष्ट्र असलेला चीन (China) सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करत आहे. केवळ चीनच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसमोर या संकटाने आव्हान निर्माण केले आहे. चीनमधील वुहान शहरातून उगम पावलेल्या या कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील सुमारे 492 नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, तब्बल 24,000 लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे.

जपानमध्ये जहाजातून जलमार्गे प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची तक्रार आल्यानंतर हे जहाज योकोहामा बंदरावरच थांबविण्या आले असून, सर्व प्रवाशांची तपासणी केली जात असल्याचे वृत्त आहे. या जहाजातून तब्बल 3000 पेक्षाही अधिक प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार या जहाजातून 3, 711 प्रवासी प्रवास करत होते. या जहाजातील प्रवाशांची चाचणी केली असता एका प्रवाशाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे पुढे आले. जपान सरकारचे प्रवक्ता योशीहिदे सुगा यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे जहाज योकोहामा बंदरावरच थांबविण्यात आले असून, सर्व प्रवाशांची चाचणी सुरु आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस जागतिक अर्थव्यवस्थेवर करतोय नकारात्मक परिणाम?)

केरळमध्ये कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी तेथील सरकारने राज्यावरील आणीबाणी घोषीत केली आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोना व्हायरसचे काही रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे 3 आणि बलरामपूर येथे एका व्यक्तीला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान,  याशिवाय बिहारमध्ये चीनमधून आलेल्या 2 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय असून, त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जयपूरमध्येही कोरोना व्हायरसचे 3 संशयीत रुग्ण आढळल्याची भीती व्यक्त केली जात आहे.