Coronavirus Outbreak In India: भारतामध्ये कोरोना व्हायरसग्रस्त रूग्णांची संख्या 43 वर दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर मध्ये आढळले नवे रूग्ण

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये प्रत्येकी एक-एक नवा रूग्ण आढळल्याने आता भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 43 वर पोहचली आहे.

Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

जगभरात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग आता भारतामध्येही येऊन पोहचला आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये प्रत्येकी एक-एक नवा रूग्ण आढळल्याने आता भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 43 वर पोहचली आहे. अद्याप भारतामध्ये कोरोना व्हायरसमुळे कुणीही दगावलेले नाही. केरळ मधील 3 कोरोनाग्रस्तांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.  महाराष्ट्र राज्यात अद्याप कोरोनाग्रस्त संशयित रूग्ण नाही मात्र 15 जण निरीक्षणाखाली असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

केरळमध्ये आज 3 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोच्चीन येथील आरोग्य प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीहून कुटुंबासह परतलेल्या तीन वर्षीय मुलाची विमानतळावर करण्यात आलेली आरोग्य चाचणी ही कोरोना व्हायरससाठी पॉझिटीव्ह आल्याने त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने खबरदारी उपाय म्हणून जम्मूच्या सर्व प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातील सर्व शाळादेखील आजपासून 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना या व्हायरसचा धोका अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जगभरात धुमाकूळ घालत असलेला हा कोरोना व्हायरस 97 देशांमध्ये पसरला आहे. तर 3800 जणांचा या व्हायरसमुळे बळी गेला आहे.