पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता साधणार देशवासियांशी संवाद; Coronavirus Lockdown च्या भवितव्याकडे जनतेचं लक्ष
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता जनतेला संबोधित करणार आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका लक्षात घेत भारत देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. 24 मार्च पासून पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार लॉकडाऊनचा 21 दिवसांचा कालावधी उद्या संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (14 एप्रिल) सकाळी 10 वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरसचे संकट अधिक दाहक रुप धारण करु लागल्याने महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, राजस्थान या राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र इतर राज्य आणि देशातील परिस्थिती पुढे कशी असेल? लॉकडाऊन वाढणार का? तसंच लॉकडाऊन वाढल्यास नियमांमध्ये कोणते बदल होणार? हे सारे प्रश्न जनेतच्या मनात आहेत. त्यामुळे उद्या मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.
देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत शनिवार (11 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्या बैठकीत अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे सुचवले होते. त्या बैठकीनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. (भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 9152; मागील 24 तासांमध्ये 35 जण Covid 19 चे बळी)
ANI Tweet:
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, दिल्ली येथे सर्वाधिक आहे. इतर राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग तुलनेने कमी असला तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतात सध्या कोरोनाचे एकूण 9152 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 308 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 856 रुग्णांची उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.