कोरोना लस Covovax ला WHO ने दिली आपत्कालीन वापरासाठी मंजुरी; Covid-19 विरुद्धच्या लढाईत सीरम इन्स्टिट्यूटला मोठे यश
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 11 राज्यांमधून ओमिक्रॉनची 101 प्रकरणे नोंदवली गेली आहेत
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (Serum Institute of India) कोरोना व्हायरसविरुद्धच्या (Coronavirus) लढाईत मोठे यश मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सीरम कोरोना लस कोवोव्हॅक्स (Covovax) ला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उत्कृष्ट सुरक्षा आणि परिणामकारकता दर्शविणारी कोरोना लस कोवोव्हॅक्सला WHO ने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. या यशाबद्दल आनंद व्यक्त करत आदर पूनावाला यांनी WHO चे आभार मानले आहेत.
WHO ने निवेदनात म्हटले आहे की त्यांनी NVX-CoV2373 साठी आपत्कालीन वापर सूची (EUL) जारी केली आहे, ज्याद्वारे SARS-CoV-2 विषाणू विरूद्ध WHO-प्रमाणित लसींचा विस्तार केला आहे. Novovax-SII च्या कोवोव्हॅक्सला नुकतीच इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये आपत्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे.
यापूर्वी, केंद्र सरकारने कोविड-19 लसीच्या 'कोव्हॉवॅक्स'च्या 5 कोटी डोसच्या निर्यातीला परवानगी दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटला कोवोव्हॅक्सच्या 50 दशलक्ष डोसच्या समतुल्य 5 दशलक्ष कुपी इंडोनेशियाला निर्यात करण्याची परवानगी होती. कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने यावर्षी 21 मे रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज केला होता. (हेही वाचा: Omicron Variant: देशात आतापर्यंत एकूण 101 जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती)
आता ही सकारात्मक बातमी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा देशात कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 11 राज्यांमधून ओमिक्रॉनची 101 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. SII ने कोवोव्हॅक्सचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी यूएसची बायोटेक कंपनी नोव्हावॅक्सशी करार केला आहे. WHO च्या मान्यतेनंतर कोवोव्हॅक्स कोविड-19 लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला जाईल. सीरम कोवोव्हॅक्सचे 1.1 अब्ज डोस पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.