Congress Party: काँग्रेस पक्षात चालयंय काय? कपिल सिब्बल, पी चिदंबरम, मल्लिकार्जुन खडगे यांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चा, राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे मात्र मौन

त्यामुळे पक्षात सध्या घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Congress | (File Image)

ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक अशी एकापाठोपाठ एक पराभवाची मालिका रचत चाललेल्या काँग्रेस पक्षात (Congress Party) नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणूक 2014 नंतर सुरु झालेली काँग्रेस पक्षाची पराभवाची मालिका अपवाद वगळता अद्यापही कायम आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्येही काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. त्यामुळे पक्षात सध्या घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला कपील सिब्बल ( Kapil Sibal), पी. चिंदंबरम (P Chidambaram), मल्लिकार्जून खडगे (Mallikarjun Kharge) यांच्यासारखे नेते विविध मतं व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Rahul Gandhi), नेते राहुल गांधी (Sonia Gandhi) हे मात्र मौन बाळगून असल्याचे पाहायला मिळत आहे.

कपील सिब्बल

काही दिवसांपूर्वीच कपील सिब्बल यांनी मत व्यक्त करत खळबळ उडवून दिली होती. ज्याचे काँग्रेस पक्षात तीव्र पडसाद उमटले. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कबील सिब्बल यांनी म्हटले की, बिहार विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतल पराभवाबाबत काँग्रेस पक्षाने अद्याप विचार केला नाही. कदाचीत नेतृत्वाला वाटत असावे की सर्व काही ठिक आहे. पराभव ही एक सामन्य घटना आहे, असे ते मानत असावेत. मला माहिती नाही पण मी माझे मत व्यक्त करत आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाबाबत काहीही बोलताना मी ऐकले नाही. नेतृत्वाच्या अवती-भोवती असलेल्या लोकांना काही बोलताना मी पाहतो. त्यांच्याकडूनच माझ्यापर्यंत माहिती पोहोचत असते असे सिब्बल यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Rahul Gandhi on Central Government: हा विकास आहे की विनाश? राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र)

पी. चिदंबरम

काँग्रेस पक्षाचे नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही काँग्रेसबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस पक्षाचे तळागाळातील संघटन राहिले नाही आणि असलेच तर ते तितके मजबूत नसल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इतक्या जागा लढवायला नको होत्या. तसेच, बिहारपेक्षाी मला गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक पोटनिवडणुकांच्या निकालावरुन अधिक आश्चर्य वाटते, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खडगे

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खडगे यांनी काँग्रेस पक्षातीलच काही वरीष्ठ नेत्यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत आहे. असे असताना काँग्रेसमधीलच काही ज्येष्ठ लोक नको ती विधाने करत आहेत. निवडणुका होईपर्यंत अध्यक्षा सोनिया गांधी याच हंगामी अध्यक्षा राहतील असे ठरले आहे. अद्याप काही निवडणुका व्हायच्या आहेत. दरम्यान, कोरोना संकटही अद्याप संपले नाही. आम्ही 100 पेक्षा जास्त लोक एकत्र आणू शकत नाही. असे असताना नेतृत्वावर चर्चा करणे योग्य नव्हे. एका बाजूला आरएसएस आमच्या मागे लागला असताना पक्षातीलच लोकांनी आपला पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तर आपण कधीही पुढे जाणार नाही, असेही खडगे यांनी या वेळी म्हटले आहे.

अधिर रंजन चौधरी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले आहे की, पक्षातील कोणाला जर काँग्रेस नेतृत्वावर शंका असेल तर त्यांनी काँग्रेस सोडून जावे किंवा आपला स्वतंत्र पक्ष काढावा, असे म्हणत काँग्रेस नेत्यांना इशारा दिला होता.

सलमान खुर्शीद

काँग्रेस नेते माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, जेव्हा पराभव होतो. परिस्थिती अडचणीची असते तेव्हा नेतृत्वावर टीका नेहमीच केली जाते. सर्व पक्षातच तसे असते. काग्रेसमध्येही तेच आहे. जेव्हा यश मिळते तेव्हा मात्र कोणी काही बोलत नाही, असे सलमान खुर्शीद यांनीम्हटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 70 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 19 जागा मिळविण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले. काँग्रेस पक्षाच्या निराशाजनक कामगिरीमुळे बिहारमध्ये महागठबंधनला सत्तेपासून दूर रहावे लागल्याचा ठपका ठेवला जात आहे.