देशातील जनताच मोदींना फासावर लटकवेल- संजय निरुपम
त्यावेळेस मोदींनी म्हटले होते की, नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा.
दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. त्यावेळेस मोदींनी म्हटले होते की, नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा. मात्र आता खुद्द मोदीही नोटाबंदीवर बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे त्या निर्णयाचा फोलपणा सिद्ध झाला आहे. असे बोलत आता 2019 मध्ये जनताच मोदींना फासावर लटकवेल, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल, असेही निरुपम म्हणाले.
पुढे मोदी सरकारवर टीका करताना निरुपम म्हणाले की, नोटाबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्याने मी मोदींच्या शब्दांचीच तुम्हाला आठवण करुन देतो. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास फासावर लटकवा, असे म्हटले होते. आता तुम्हाला फासावर जायचंय. पण आम्ही तुमच्यासारखे क्रुर नाही. आम्ही तुम्हाला फासावर लटकवणार नाही तर देशातील जनताच तुम्हाला फासावर लटकवेल. म्हणजेच 2019 च्या निवडणूकीत जनता मोदींचा पराभव करणार, या अर्थाने हे विधान केल्याचेही त्यांनी सांगतिले.
मोदींनी जशा नोटा बदलल्या तसे जनतेने आता मोदींना बदलावे. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास जगणे कठीण होईल. मोदी हे शकूनी मामा असल्याचे सांगत 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी आणि भाजपाचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
नोटाबंदीमुळे जीडीपी घसरला, 15-20 लाख लोकांनी रोजगार गमावला. अशा उद्ध्वस्त परिस्थितीत मी मोदींना त्यांच्या विधानाची आठवण करुन देतो. मोदींना कोणत्या चौकात फासावर लटकायचं आहे, तेही मोदींनी सांगावं, असेही निरुपम यावेळी म्हणाले.