Raja Pateria Arrested: 'पंतप्रधानांना मारा' वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना अटक

'संविधान वाचवायचे असेल तर पंतप्रधानांना मारा' अशा आशयाचे वक्तव्य पटेरिया यांनी कथितरित्या केले आहे. वक्तव्य करतानाचा त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Raja Pateria , Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटेरिया (Congress leader Raja Pateria) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 'संविधान वाचवायचे असेल तर पंतप्रधानांना मारा' अशा आशयाचे वक्तव्य पटेरिया यांनी कथितरित्या केले आहे. वक्तव्य करतानाचा त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वक्तव्यावरुन जोरदार वाद निर्माण झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी राजा पटेरिया (Raja Pateria) यांना अटक केली आहे. पटेरिया यांच्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा उल्लेख असल्याने भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता.

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत राजा पटेरिया भाषण करताना दिसतात. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात बोलताना 'मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील; दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आहे. जर संविधान वाचवायचे आहे, मग मोदींना मारायला तयार व्हा', असे सांगताना दिसत आहेत.

मध्य प्रदेशचे माजी राज्यमंत्री असलेल्या पटेरिया यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला नसता तरच नवल. त्यांच्या वक्तव्यानंतर मध्य प्रदेश सरकारने पटेरिया यांच्यावर पोलिस खटला दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पटेरियाविरुद्ध सोमवारी दुपारी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पटेरिया यांना राज्याच्या दमोह जिल्ह्यातील हाता शहरातील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. (हेही वाचा, Raja Pateria Controversial Statement: ‘संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधानांना मारा’; काँग्रेस नेते राजा पटेरिया यांचे वादग्रस्त विधान)

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या टिप्पण्यांचा निषेध केला आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले: "भारत जोडो यात्रा करण्याचे नाटक करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहे", अशा शब्दात शिवराज सिंह चौहाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या निवेदनात बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसचे लोक मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी स्पर्धा करू शकत नाहीत, म्हणूनच काँग्रेसचा एक नेता त्यांना मारण्याची भाषा करत आहे. ही द्वेषाची पराकाष्ठा आहे. काँग्रेसच्या खऱ्या भावना समोर येत आहेत.

दरम्यान, त्याच व्हिडिओमध्ये, पटेरिया यांनी दावा केला की त्यांच्या भाषणातील "हत्या" या शब्दाचा अर्थ "पराभव" असा होतो. काँग्रेस नेत्याने (पटेरिया) सांगितले की ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारसरणीचे अनुयायी आहेत आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींना निवडणुकीत पराभूत करणे आवश्यक आहे. दरम्यान, श्रीमान पटेरिया यांनी केलेल्या "निंदनीय" टिप्पण्यांबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.