Rahul Gandhi on Adani & PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्मावर बोट, अडाणी मुद्द्यावरुन राहुल गांधी यांचा पुन्हा प्रहार

संसदेतही आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगतात. पण आम्ही मागे हटणार नाही. उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारतच राहणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi on Narendra Mod | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अडाणी मुद्द्यावरुन जोरदार प्रहार केला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याबद्दल अवघे जग प्रश्न विचारत आहे. संसदेतही आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगतात. पण आम्ही मागे हटणार नाही. उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारतच राहणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. ते रायपूर येथील काँग्रेस अधिवेशनात बोलत होते. या वेळी त्यांनी संसदेत उपस्थित केलेल्या अदानींच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनाही जोरदार फटकारले.

अडाणी मुद्द्यावरुन संसतेत प्रश्न विचारताच भाजपमधील अनेक मंत्री आणि नेते आक्रमक झाले. अडाणी यांच्यावरील प्रश्न म्हणजे देशावरील हल्ला असल्याचे ते सांगत होते. पण अदाणी म्हणजे देशाचा मुद्दा केव्हापासून झाला. ते लोक अडाणी यांना पाठिंबा का देत आहेत? अडाणी आणि त्यांच्या कंपन्या देशाच्या विरोधात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांनीही ते लक्षात घ्यावे असे राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Sonia Gandhi On Political Retirement: मी कधीही निवृत्त झाले नाही आणि कधी होणारही नाही; राजकारणातील निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान सोनिया गांधींचे महत्त्वपूर्ण विधान)

ट्विट

गौतम अदाणी आणि पंतप्रधान मोदी हे एकच आहेत. त्यामुळेच तर आम्ही संसदेत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. मी लोकसभेत विचारलेल्या आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी हे सर्व प्रश्नच संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी आक्रमकपणे सांगितले.

ट्विट

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, मला अदानींना सांगायचे आहे की, ते आणि त्यांची कंपनी देशाच्या विरोधात काम करत आहेत. देशाची साधनसंपत्ती, पायाभूत सुविधा यांना धक्का लावत असल्याचेही ते म्हणाले. ब्रिटीशांचा दाखला देत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याची लढाई एका कंपनीविरुद्ध होती कारण तिने सर्व संपत्ती आणि बंदरे इ. हिरावून घेतली होती. आजही इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. हे देशाविरुद्धचे काम आहे आणि तसे झाल्यास संपूर्ण काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात उभा राहील, असेही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले.