काँग्रेस नेते एन. डी. तिवारी यांचे निधन ; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ते 93 वर्षांचे होते.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. शनिवारी फिजिओथेरपी घेत असताना त्यांनी प्रतिक्रीया देणे बंद केले. त्यानंतर त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तिवारी यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, फिजिओथेरपी घेत असताना तिवारी यांनी प्रतिक्रीया देणे बंद केले. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा रोहीत शेखर तिवारी उपस्थित होता. त्यानंतर त्यांना तात्काळ मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
आज त्यांचा वाढदिवस होता. आपल्या जन्मदिवसा दिवशीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून ते किडनी इंफेक्शन आणि लो ब्लड प्रेशरमुळे त्रस्त होते.
दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे एन. डी. तिवारी ही एकमेव होते. 1976-77, 1984-85 आणि 1988-89 या काळात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तर 2002-2007 या काळात त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवले. 1986-1987 या काळात ते पंतप्रधान राजीव गांधींच्या कॅबिनेटमध्ये परराष्ट्रमंत्री होते. त्याचबरोबर 2007-09 या काळात त्यांनी आंध्रप्रदेशचे गर्व्हनर म्हणून काम पाहिले.
यावर्षी जुलै महिन्यात त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता.