Cold Wave in Delhi: राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट, तापमान एकांकी आकड्यावर, निराधारांचा निवाराकेंद्रात मुक्काम

निवारा घरे अन्न, खाटा आणि वैद्यकीय मदत पुरवतात. तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Cold Wave In Delhi | (फोटो सौजन्य - ANI)

IMD Weather Forecast Delhi: राष्ट्रीय राजधानी दिल्ली थंडीची लाट (Delhi Cold Wave) उसळली आहे. तापमान एक अंकी आकड्यार घसरल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. इतकी की, बेघर नागरिकांना राज्य सरकारने उभारलेल्या निवाराकेंद्रांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. खास करुन जामा मशीद आणि एम्स दिल्ली परिसरातील लोक कडाक्याच्या थंडीशी झुंज देत असल्याचे दिसून आले. एम्स दिल्लीजवळच्या निवाऱ्याचे व्यवस्थापन करणारे वेद पाल यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 40 हून अधिक लोकांनी निवारा केंद्रातील विवीध सेवांचा वापर केला. "हा कौटुंबिक निवारा आहे. आम्ही आवश्यकतेनुसार योग्य खाटा आणि अनेक ब्लँकेट्स पुरवतो. याव्यतिरिक्त, सकाळी चहा आणि रसांसह दिवसातून दोनदा अन्न दिले जाते ", असे त्यांनी एएनआयला सांगितले.

निवारा केंद्रातील रहिवाशांसाठी वैद्यकीय मदत

निवाराकेंद्र व्यवस्थापक वेद पाल यांनी निवाऱ्यात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांवर प्रकाश टाकला.ते म्हणाले, आमच्याकडे प्राथमोपचार पेटी आहे आणि जर कोणाला आरोग्याची गंभीर समस्या असेल तर त्यांना एम्समध्ये नेले जाते. डॉक्टर नियमितपणे आमच्याकडे येतात आणि आम्ही पॅरासिटामॉलसारख्या मूलभूत औषधांचा साठा करुन ठेवलेला असतो, असे ते म्हणाले. आणखी एका 22 लोकांच्या दुसऱ्या निवारा केंद्रात, दोन्ही कुटुंबे आणि अविवाहितांना समान सुविधा पुरविल्या जातात. निवारा केंद्राचे व्यवस्थापक सोमू मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, "आम्ही योग्य खाटा, अन्न आणि वैद्यकीय सहाय्य सुनिश्चित करतो. आपत्कालीन परिस्थितीसाठी एम्स जवळच आहे आणि आम्ही तात्काळ गरजांसाठी प्रथमोपचार पेटी ठेवतो. (हेही वाचा, पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट कायम, फरीदकोटमध्ये किमान तापमान एक अंश सेल्सिअसवर)

मदतीसाठी दिल्ली सरकारचे कौतुक

जामा मशिदीजवळच्या निवाऱ्यात राहणाऱ्या रोशन कुमारने दिल्ली सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. "येथे 30 ते 100 लोकांची क्षमता असलेले चार निवारे आहेत. अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसह आम्हाला दिवसातून तीन वेळा अन्न मिळते. आवश्यक त्या सर्व सुविधा सरकारकडून पुरविल्या जात आहेत. (हेही वाचा,Nashik Weather Update: नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरला, पहा आजचे तापमान )

उत्तर भारतात थंडीची लाट, आयएमडीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये "शीत लाट ते तीव्र शीत लाट" परिस्थितीचा निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. आयएमडी वैज्ञानिक सोमा सेन रॉय यांनी सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे तापमान 1-2 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते.

दिल्ली शहरात तापमानाचा पारा घसरला

दिल्लीत 14 डिसेंबर रोजी किमान तापमान 8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, हे तापमान आणखी 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्ली तीव्र थंडीच्या लाटेचा सामना करत असताना, शहरातील असुरक्षित लोकसंख्येला दिलासा देण्यात निवारा घरे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अन्न, वैद्यकीय मदत आणि उबदार अंथरूणासह, हे निवारे कठीण हिवाळ्याशी झुंज देत असलेल्या अनेकांसाठी जीवनरेखा आहेत. दरम्यान, तापमानात आणखी घट होणार असल्याने रहिवाशांना पुढील थंड दिवसांसाठी सज्ज राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.