Cisco Layoffs: सिस्को करणार तब्बल 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; जाणून घ्या अपेक्षेपेक्षा चांगले निकाल असूनही का घेतला निर्णय
या वर्षामध्ये दुसऱ्यांदा कंपनीने नोकरकपात जाहीर केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीने 4,000 लोकांना नोकरीतून काढून टाकले होते. हे प्रमाण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या 5 टक्के होते.
Cisco Layoffs: आघाडीची नेटवर्किंग कंपनी सिस्को (Cisco) मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. कंपनीने नुकतेच चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते, म्हणजे मे ते जुलै, जे अपेक्षेपेक्षा चांगले होते. यानंतरही कंपनीने मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची योजना आखली आहे. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 7 टक्क्यांनी कमी करू शकते. कंपनीने ही माहिती यूएस एक्सचेंजला दिली आहे.
या टाळेबंदीचा परिणाम कंपनीच्या एकूण 6,000 कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. या वर्षामध्ये दुसऱ्यांदा कंपनीने नोकरकपात जाहीर केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीने 4,000 लोकांना नोकरीतून काढून टाकले होते. हे प्रमाण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या 5 टक्के होते.
आता होणाऱ्या या कपातीद्वारे सिस्कोला आपला खर्च कमी करून सायबर सुरक्षा आणि एआय (AI) वर लक्ष केंद्रित करायचे आहे. अमेरिकेतील एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय कंपनीला $1 बिलियनने खर्च कमी करण्यास मदत करू शकतो. कंपनी एआय आणि सायबर सुरक्षेवरील खर्च वाढवणार आहे. सिस्कोला आशा आहे की, या निर्णयानंतर कंपनी आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 700 ते 800 दशलक्ष डॉलर्सची बचत करू शकेल. उर्वरित रक्कम वर्षअखेर वाचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा: Cognizant Offering 2.5 LPA to Freshers: कॉग्निझंटने फ्रेशर्सना ऑफर केले वार्षिक 2.5 लाख रुपयांचे पॅकेज; नेटीझन्सनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली)
सिस्कोने जून 2024 मध्ये एआय स्टार्टअप कंपन्या Cohere, Mistral आणि Scale मध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. कंपनी या तीन स्टार्टअपमध्ये 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय कंपनी Nvidia च्या सहकार्याने एआयवर काम करणार आहे. सिस्कोपूर्वी, इंटेलने 15,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्याआधी डेलने 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणाही केली होती. 2024 मध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये टाळेबंदीची प्रक्रिया सुरूच आहे. मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल यांसारख्या बड्या कंपन्यांनी अलीकडच्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.