8 व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर; 25 सप्टेंबरलाच बँक खात्यात जमा होणार पगार! हे आहे कारण
अर्थ मंत्रालयाने सर्व विभाग आणि मंत्रालयांना सप्टेंबरचा पगार २५ सप्टेंबर रोजीच देण्याची सूचना केली आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँक कर्मचारी संघटनांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. संपाचा कालावधी बँकांच्या अर्धवार्षिक लेखाबंदीशी जुळणारा आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) पुकारलेल्या तीन दिवसांच्या बँक संपाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने सर्व विभाग आणि मंत्रालयांना सप्टेंबरचा पगार २५ सप्टेंबर रोजीच देण्याची सूचना केली आहे. अर्थ मंत्रालयांतर्गत नियंत्रक महालेखा (कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स) कार्यालयाने यासंबंधी कार्यालयीन आदेश काढला आहे.
२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित देशव्यापी बँक संप लक्षात घेऊन सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०२६ चे पगार, वेतन आणि निवृत्तिवेतन शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी काढून वितरित करावे, असे त्यात म्हटले आहे. हा निर्णय संरक्षण, टपाल आणि दूरसंचार विभागांसह सर्व केंद्रीय कार्यालयांना लागू आहे.
संपाचा कालावधी चालू तिमाहीच्या अखेरच्या दिवसांशी जुळत असल्याने, सप्टेंबरच्या अखेरीस नियोजित इतर देयके आणि बँकिंग व्यवहारही शक्य असल्यास आधीच पूर्ण करावेत, अशी सूचना आदेशात आहे. संबंधित मंत्रालये आणि विभागांनी ही सूचना आपल्या कार्यालयांना तातडीने कळवावी, असेही म्हटले आहे. बँकांच्या देयक शाखांना या सूचना कळवण्याची विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला करण्यात आली आहे. नक्की वाचा: Bank Strike: बँका बंद, मग UPI चं काय? 28 ते 30 सप्टेंबरच्या संपात पेमेंट अडकणार का?
अग्रिम रक्कम म्हणून गणना
२५ सप्टेंबर रोजी जमा होणारी रक्कम सप्टेंबर २०२६ साठीची अग्रिम रक्कम मानली जाईल. महिन्याचा पूर्ण पगार निश्चित झाल्यानंतर काही फरक असल्यास तो ऑक्टोबर २०२६ च्या पगारातून समायोजित केला जाईल, असे आदेशात नमूद आहे. म्हणजेच कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. महिनाअखेरीस बँका बंद राहिल्यास होणारी गैरसोय टाळणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.
रविवारीही बँका सुरू राहणार
अर्थ मंत्रालयाने प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व बँकांना २७ सप्टेंबर रोजी रविवारी ग्राहकांच्या सोयीसाठी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना मोबाइल बँकिंग, एटीएम आणि इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या सूचना जारी केल्या आहेत.
संप कोणी आणि का पुकारला
यूएफबीयू बँकिंग क्षेत्रातील ९० टक्के कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करते. संघटनेने २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करणे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. इतरही काही मागण्या आहेत. संप प्रत्यक्षात झाल्यास तो बँकिंग क्षेत्राच्या अर्धवार्षिक लेखाबंदीच्या काळात येईल. ३० सप्टेंबर रोजी बँकांची अर्धवार्षिक लेखाबंदी होते.
यूएफबीयू ही नऊ बँक कर्मचारी संघटनांची शिखर संस्था आहे. यापूर्वी मार्च २०२५ मध्ये दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. अर्थ मंत्रालय आणि भारतीय बँक संघटनेने (आयबीए) पाच दिवसांचा आठवडा आणि पुरेशी भरती या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर तो स्थगित करण्यात आला होता. यंदाचा संप प्रत्यक्षात होणार की नाही, हे संघटना आणि सरकार यांच्यातील चर्चेवर अवलंबून असेल.
संप झाल्यास शाखांमधील चेक क्लिअरिंग आणि रोखीशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यूपीआयसारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील, असे बँकांनी सांगितले आहे.