सेंसेक्स । फाईल फोटो

कोरोना संकटकाळात गडगडलेलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आता पुन्हा उभारी घेण्यास सुरू झालं आहे. जगभरात अअता हळूहळू कोविड 19 शी सामना करत व्यवहार पूर्ववत सुरू करण्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे भारतातही त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मार्केटने जोरदार स्वागत केल्यानंतर आता आठवडाभरानंतरही मुंबई शेअर बाजारात सेंसेक्स आणि निफ्टी मध्ये तेजी कायम आहे. आज सकाळी ओपनिंग सेशन मध्ये Sensex 527.25 अंकांनी वधारून 51,258.88 वर पोहचला आहे. तर निफ्टी 150.80 अंकांनी वधारून 15,075.05 वर पोहचल्याचं बघायला मिळालं आहे. ही शेअर बाजारातील विक्रमी कामगिरी आहे.

आज बीएसई मध्ये सुरूवातीला सुमारे 1605 कंपन्यांचं ट्रेडिंग सुरू झाले आहे. यामध्ये 1243 शेअर्स तेजीत तर 303 कंपन्यांमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. तर 59 कंपन्यांच्या शेअर्स मध्ये कोणत्याही वाढ किंवा घट यांची नोंद झालेली नाही.

निफ्टी मध्ये महिन्द्रा एंड महिन्द्रा चे शेअर 51 रूपयांनी तेजीत 916.85 वर उघडले तर ओएनजीसी चा शेअर 2 रूपयांनी वाढून 100 वर उघडला आहे. सेंसेक्स मध्ये महिंद्रा अ‍ॅन्ड महेंद्रा, अ‍ॅक्सिस बॅंक, आयसीआयसीआय, इंडसइंड बॅंक, एसबीआय तेजीत पहायला मिळाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया देखील 6 पैशाने मजबूर झाला आहे. आज एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया 72.86 आहे.

शुक्रवारी सेंसेक्स बंद होताना 117.34 अंक म्हणजे 0.23% तेजीत 50731.63 वर बंद झाला होता तर निफ्टी 28.60 अंक म्हणजे 0.19% वाढून 14,924.25 वर बंद झाला होता. हे मार्केट बंड होतानाचे विक्रमी अंक होते.