Bribery Case: भाजप आमदार Madal Virupakshappa यांना लाचखोरी प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन अर्ज
लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने काही दिवसांपूर्वी आमदारांचा मुलगा प्रशांत मदल याला 40 लाखांची लाच घेताना अटक केली होती.
चन्नागिरी येथील भाजप आमदार के मदल विरुपक्षप्पा यांना कर्नाटकात अटक करण्यात आली आहे. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने भाजप आमदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून त्यांची अटक जवळपास निश्चित मानली जात होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान लोकायुक्तांच्या वकिलांनी जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला.
लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने काही दिवसांपूर्वी आमदारांचा मुलगा प्रशांत मदल याला 40 लाखांची लाच घेताना अटक केली होती. ही लाच तो वडिलांच्या वतीने घेत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. भ्रष्टाचार शाखेने भाजप आमदाराच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपये आणि त्यांच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकायुक्तांच्या या कारवाईनंतर मदल विरुपक्षप्पा यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.