Boundary Walls: गुरांची धडक टाळण्यासाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय; बांधणार 1,000 किमी नेटवर्कवर सीमा भिंत
यावर्षी आतापर्यंत सुमारे 4,000 गाड्या अशा प्रकारे प्रभावित झाल्या आहेत.
वंदे भारत ट्रेनने (Vande Bharat Train) धडक दिल्यामुळे गायी आणि म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वलसाड येथेही या ट्रेनने एका गायीला धडक दिली होती. या पार्श्वभुमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, ज्या ठिकाणी गुरांना रेल्वेची धडक बसल्याची अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, अशा रेल्वे नेटवर्कच्या भागांमध्ये पुढील सहा महिन्यांत 1,000 किमी सीमा भिंत (Boundary Walls) बांधली जाणार आहे.
अधिकृत माहितीनुसार, रुळांवर गुरे आल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या नऊ दिवसांत जवळपास 200 गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यावर्षी आतापर्यंत सुमारे 4,000 गाड्या अशा प्रकारे प्रभावित झाल्या आहेत. वैष्णव म्हणाले, 'रेल्वे मार्गावर भिंत बांधण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आम्ही दोन वेगवेगळ्या डिझाईन्सचा विचार करत आहोत. येत्या पाच-सहा महिन्यांत भक्कम भिंत बांधण्यास आम्ही मंजुरी दिली असून, डिझाईन पूर्ण झाल्यास एक हजार किमी लांबीची भिंत बांधण्याचा आमचा विचार आहे.’
पारंपारिक भिंतींमुळे गाड्यांवरून गुरांचा प्रश्न सुटणार नाही, असेही ते म्हणाले. जनावरांच्या धडकेच्या तीन घटनांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु मंत्र्यांनी फक्त गुरांनाच रेल्वे रुळापासून दूर ठेवण्यासाठी नव्हे, तर मानवी हस्तक्षेपापासूनही संरक्षण करण्यासाठी सीमा भिंत बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात येणार आहे, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. (हेही वाचा: महिलेने दिल्ली विमानतळावर दिला बाळाला जन्म; पहिल्यांदाच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली प्रसूती)
दरम्यान, माहितीनुसार, 2020-21 मध्ये 26,000 गुरांच्या 6,500 हून अधिक प्रकरणांसह, उत्तर मध्य रेल्वे सर्वात जास्त प्रभावित झोनपैकी एक आहे. हे झोन 3,000 किमी ट्रॅक कव्हर करते. यामध्ये दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरचे काही भाग समाविष्ट आहेत. त्यात आग्रा, झाशी आणि प्रयागराज सारख्या मंडळांचा समावेश आहे. सीमा भिंत बांधण्यासाठी ओळखल्या गेलेल्या पट्ट्यांमध्ये उत्तर मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेच्या विभागांचा समावेश आहे.