कोट्यावधींच्या रेल्वे E-Ticket घोटाळ्याचा भांडाफोड; दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा संशय, देशभरात 20 हजार एजंट्स कार्यरत
या प्रकरणाबाबत देशभरातून 27 जणांना अटक केली आहे.
अवैध सॉफ्टवेअरद्वारे रेल्वे ई-तिकिटाच्या (E-Ticket) मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या घोटाळ्याचा, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) भांडाफोड केला आहे. या प्रकरणाबाबत देशभरातून 27 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात 10 दिवसांपूर्वी बंगळुरू येथील गुलाम मुस्तफा (Ghulam Mustafa) नावाच्या व्यक्तीला पहिली अटक झाली होती.
गुलाम मुस्तफा हा ई-तिकीट बनविणे व ते कन्फर्मिंग करण्याचे सॉफ्टवेअर विकत असे. अटकेनंतर गुलाम मुस्तफाच्या लॅपटॉपची तपासणी केली असता, त्यात पाकिस्तान, बांगलादेश, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि नेपाळ यांचे दुवे उघडकीस आले. यासह या देशांमधील अनेक नंबरही मुस्तफाकडून प्राप्त झाले आहे. आरपीएफसोबत आयबी आणि एनआयए देखील गुलाम मुस्तफाची चौकशी करीत आहेत.
अटक करण्यात आलेल्या गुलाम मुस्तफाकडे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले, अत्याधुनिक तंत्रज्ञानही सापडले असल्याचा दावा केला गेला आहे. या टोळीत 20,000 हून अधिक एजंट्स असलेली, 200 ते 300 पॅनेल देशभरात कार्यरत आहेत आणि त्याचा नेता हमीद अशरफ (Hamid Ashraf) दुबईमध्ये आहे. तो पाकिस्तानची संशयित आणि वादग्रस्त संघटना तबलीक-ए-जमातशी संबंधित आहे. यामध्ये बंगलोरमधील सॉफ्टवेअर कंपनीची भागीदारी आहे. मुस्तफा या मुख्य सूत्रधाराच्या आधारे आणखी 24 जणांना अटक करण्यात आली आहे.
या टोळीने अवैध सॉफ्टवेअरद्वारे तत्काळ वर्ग रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार केला आहे. त्याचबरोबर क्रिप्टो चलन आणि हवालामार्फत परदेशात पैसे पाठवून, त्यांचा उपयोग दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी केला गेला असल्याची शक्यता, आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी मंगळवारी बोलून दाखवली. यांचा म्होरक्या हमीद अशरफ नावाच्या या व्यक्तीला, रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. (हेही वाचा: रेल्वे तिकीट महाघोटाळा: तब्बल साडेतीन कोटी रुपयांची तिकिटे बेकायदा विकली; एकाच दिवशी कारवाई करत 387 एजंटना अटक)
2019 मध्ये गोंडा येथील एका शाळेत बॉम्बस्फोट केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर हमीद अशरफ बहुधा नेपाळमार्गे दुबईला पळून गेला. या हमीद अशरफच्या अंतर्गत भारतातील सुमारे 20 हजार लोक रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळेबाजार करत आहेत. मुस्तफाची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 2400 बँक खाती आहेत, तर 600 खाती प्रादेशिक बँकांमध्ये आहेत. या ई तिकिटांचा काळा बाजार करून त्याने महिन्याला 10 ते 15 कोटी रुअये कमावले आहेत.