Bihar: व्यक्तीने चार राज्यातील 6 महिलांशी केले लग्न; मेव्हण्याने 'अशी' केली पोलखोल
छोटू देवघरमधील एका ऑर्केस्ट्रामध्ये गायक म्हणून काम करतो. त्याने चार राज्यातील सहा महिलांशी लग्न केले आहे. छोटूने चिनावेरिया, सुंदरतांड, रांची, संग्रामपूर, दिल्ली आणि देवघर येथील महिलांशी लग्न केले आहे.
बिहारमधील (Bihar) जमुई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर सहा लग्ने केली आहेत. जेव्हा त्याच्या एका मेव्हण्याने त्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडले तेव्हा तरूणाच्या सहा लग्नांचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत तरुणाची सहा लग्ने झाल्याचे उघड झाले. छोटू कुमार असे सहा लग्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो बरहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जावातारी गावचा रहिवासी आहे.
सोमवारी सायंकाळी छोटूची पत्नी मंजूचा भाऊ जमुई स्टेशनवर आला होता. त्यावेळी त्याने आपल्या मेव्हण्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहिले. त्यानंतर त्याने तत्काळ याची माहिती कुटुंबीयांना दिली. घाईघाईत कुटुंबीय स्टेशनवर पोहोचले, तिथे त्यांनी छोटूला दुसऱ्या महिलेसोबत पकडले. पुढे नातेवाईकांनी स्टेशनवरच गोंधळ सुरू केला. त्यांनी जेव्हा महिलेबाबत विचारणा केली, तेव्हा ती छोटूची पत्नी असल्याचे समोर आले. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी छोटूला पकडून पोलीस ठाण्यात नेले.
छोटूची पत्नी मंजूची आई कोबिया देवी यांनी पोलिसांना ही गोष्ट सांगितली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. कोबिया देवी यांनी सांगितले की, 2018 साली त्यांच्या मुलीचे छोटूसोबत लग्न झाले होते. दोघांना दोन मुलेही आहेत. दीड वर्षापूर्वी छोटू मुलासाठी औषध आणण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो परतला नाही. महिलेने सांगितले की, जेव्हा तिच्या मुलाने छोटूला दुसऱ्या महिलेसोबत पाहिले तेव्हा त्याचे सत्य समोर आले. त्यांची मुलगी दीड वर्षांपासून याची वाट पाहत होती. कोबिया देवी म्हणतात की, जावई छोटूने त्यांची फसवणूक केली आहे. (हेही वाचा: UP Crime: महिलेने अल्पवयीन सावत्र मुलीला पेटीत केले बंद, गुन्हा दाखल)
चौकशीदरम्यान, समोर आले की, छोटू देवघरमधील एका ऑर्केस्ट्रामध्ये गायक म्हणून काम करतो. त्याने चार राज्यातील सहा महिलांशी लग्न केले आहे. छोटूने चिनावेरिया, सुंदरतांड, रांची, संग्रामपूर, दिल्ली आणि देवघर येथील महिलांशी लग्न केले आहे. छोटूला सर्व विवाहातून मुले आहेत. छोटू जिथे ऑर्केस्ट्रेट करायला गेला, तिथे त्याने लग्न केले. तो काही दिवस पत्नीसोबत राहायचा, कुटुंब वाढवायचा व नंतर पत्नी-मुलांना सोडून पळून जायचा. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2022 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

