Bihar Shocker: बिहारमध्ये दलित व्यक्तीस थुंकी चाटण्याची शिक्षा; निवडणुकीत पाठिंबा न दिल्याच्या कारणावरुन माजी गावप्रमुखाचे कृत्य
या कारणावरुन अभय कुमार सिंह याचे समर्थक मोठ्या प्रमाणावर चिडले. त्यांनी या युवकास पकडले आणि त्याला स्वत:ची तसेच इतरांची थुंकी चाटण्यास सांगितले. पीडितास मारहाण झाल्याचाही आरोप आहे.
एका दलित (Dalit) तरुणाला जमीनीवर टाकलेली थुंकी चाटण्यास लावण्याची कृत्य घडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहकार्य न केल्यावरुन ही घटना बिहारमधील गया येथे घडली. बिहारमधील गया जिल्ह्यातील वजीरगंज प्रखंड येथे घुरियावां पंचायतीचा माजी प्रमुख अभय कुमार सिंह याने दलीत युवकास आपल्या घरी बोलवून त्याच्यासोबत अमानवीय व्यवहार केला. गावप्रमुखाच्या निवडणुकीत (Bihar Mukhia Election) सहकार्य केले नाही. या कारणावरुन अभय कुमार सिंह याचे समर्थक मोठ्या प्रमाणावर चिडले. त्यांनी या युवकास पकडले आणि त्याला स्वत:ची तसेच इतरांची थुंकी चाटण्यास सांगितले. पीडितास मारहाण झाल्याचाही आरोप आहे.
गया येथील अमानवीय घटनेचा व्हिडिओही बनविण्यात आला. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की पीडिताकडून माफी मागून घेतली जात आहे. पीडिताकडूनही एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. या व्हिडिओत पीडित म्हणतो की माजी गाव प्रमुखाने त्याच्याकडून थुंकी चाटून घेतली. तसेच रात्रीच्या वेळी घरी येऊन माझ्या कुटुंबीयांना मारहाण केली. त्यानंतर मी आणि माझे कुटुंबीय जीव वाचविण्याच्या हेतूने घर सोडून नातेवाईकांकडे आश्रयाला आलो. पीडित व्यक्तीने म्हटले आहे की, माजी गाव प्रमुखाने त्याला आगामी निवडणुकीत सहकार्य करण्यास आणि प्रचार करण्यास सांगितले होते. मात्र, आपण तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले आणि मारहाण करत माझ्याकडून थुंकी चाटून घेतली.
गया येथील एसएसपी आदित्य कुमार यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. एसएसपीने वजीरगंज पोलिसांना आदेश दिले आहेत की, व्हिडिओच्या आधारे तपास करुन संबंधितांना तातडीने अटक करा. दरम्यान, या घटनेतील काही लोक फरार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, सर्व आरोपींना लवकरच अटक केले जाईल.