दशकातील सर्वात मोठा विवाहसोहळा: 500 कोटी खर्च, 1 लाख पाहुणे, 40 एकरचा मंडप; 'असा' असेल BJP मंत्री श्रीरामुलु यांच्या कन्येचा लग्नसमारंभ

हे लग्न त्याच्या भव्यतेमुळे या दशकातल्या सर्वात मोठ्या विवाहसोहळ्यांमध्ये समाविष्ट होत आहे. तब्बल 9 दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे, ज्याची सुरुवात 27 फेब्रुवारीला झाली

बी.सी. श्रीरामुलु कन्या विवाह (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या आजूबाजूला विवाहसोहळे हे नेहमीच होत असतात. परंतु अशी काही लग्ने असतात जी, त्यांची रॉयल स्टाईल, प्रचंड खर्च, भव्य सजावट अशा अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहतात. बेंगलुरूमधील पॅलेस मैदान अशाच एका लग्नाची साक्ष ठरणार आहे. हे लग्न भाजप सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री बी.सी. श्रीरामुलु (B. Sriramulu) यांच्या कन्येचे आहे.

श्रीरामुलुची यांची कन्या रक्षिता (Rakshita) 5 मार्चला हैदराबादी उद्योगपती रवि कुमारची वधू होणार आहे. हे लग्न त्याच्या भव्यतेमुळे या दशकातल्या सर्वात मोठ्या विवाहसोहळ्यांमध्ये समाविष्ट होत आहे. तब्बल 9 दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे, ज्याची सुरुवात 27 फेब्रुवारीला झाली.

या लग्न समारंभात एकूण एक लाख अतिथींना आमंत्रित केले गेले आहे. तसेच श्रीरामुलू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही या लग्नासाठी आमंत्रित केले आहे. राज्यातील विविध मठांचे 500 संत वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचू शकतात. लग्नासाठी 40 एकरांवर विस्तारित असा मंडप तयार केला जात आहे. 24 एकरांवर शाही विवाह होणार असून, उर्वरित पंधरा एकरात पाहुण्यांची वाहने पार्क करण्याची सोय केली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कित्येक कामगार या लग्नासाठी भव्य सेट बनवित आहेत.

लग्नाचा मुख्य मंडप इंद्रसभेप्रमाणे सजविला ​​जात आहे. पॅलेस मैदानावरील लग्नाचा मुख्य मंडप मंड्या जिल्ह्यातल्या मेलेकोटे चालुवारायस्वामी मंदिराच्या कल्याणीप्रमाणे बांधला जात आहे. पाहुण्यांसाठी शहरातील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. अंबानी यांच्या मुलीच्या लग्नात व्हिडिओग्राफी व छायाचित्रण करणार्‍या जयरामन पिल्लई यांच्या टीमला या शाही लग्न सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मुलींचा मेकअप आणि तिला तयार करण्याची जबाबदारी दीपिका पादुकोणच्या मेक-अप आर्टिस्टला देण्यात आली आहे. (हेही वाचा: लग्नात नवरदेवाची झाली हवेतून एन्ट्री, व्हिडियो पाहून तु्म्हीही व्हाल थक्क, Watch Video)

बी. श्रीरामुलू हे कर्नाटक राज्यातील भाजपचे मोठे नेते आहेत. ते बेल्लारी येथील कर्नाटक विधानसभेचे सदस्य होते. चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोलाकल्मुरु मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभेचे ते सदस्य आहेत. सध्या कर्नाटक सरकारमध्ये ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि मागासवर्गीय कल्याण कल्याण मंत्री आहेत.

या लग्नासाठी परदेशातून फुले मागवण्यात आली आहेत. यापूर्वी 2018 मध्ये माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांनी मुलीच्या लग्नात, 400 ते 500 कोटी रुपये खर्च करून इतिहास रचला होता.