Bhubaneswar Airport Chaos Viral Video: इंडिगोचे विमान रद्द झाल्याने संतापलेल्या महिलेने केली तोडफोड, व्हिडिओ व्हायरल
भुवनेश्वर विमानतळावर इंडिगोचे विमान अनेक तास उशिराने रद्द झाल्याने एका महिला प्रवाशाने संताप व्यक्त करत तोडफोड केली. लगेज बेल्टवर चढून तिने कागदपत्रे फेकली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भुवनेश्वर विमानतळावर (Bhubaneswar Airport ) एका महिला प्रवाशाने लगेज कन्व्हेयर बेल्टवर चढून इंडिगोच्या (IndiGo) कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर कागदपत्रे भिरकावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंडिगोचे विमान रद्द झाल्याने संतप्त झालेल्या महिलेने हा प्रकार केल्याचे समजते आहे. दरम्यान ही घटना गुरुवार (13 ऑगस्ट) ची आहे. दुपारी 2:35 वाजता भुवनेश्वरहून उड्डाण करणारे इंडिगोचे विमान रद्द करण्यात आले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, विमान रद्द झाल्याची माहिती त्यांना संध्याकाळी सुमारे 5:30 वाजता म्हणजे नियोजित वेळेनंतर तब्बल तीन तासांनी देण्यात आली. या विलंबामुळे आणि वेळेत माहिती न मिळाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला.
महिलेचा संताप, कर्मचाऱ्यांवर कागदपत्रे भिरकावली
व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला लगेज बेल्टवर चढून इंडिगोच्या ऑफिस डेस्ककडे कागदपत्रे फेकताना दिसत आहे. यावेळी उपस्थित काही प्रवाशांनी महिलेचे मूल आजारी असल्याचे सांगितल्याचेही व्हिडिओत ऐकू येते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विमानतळाच्या मालमत्तेचे नुकसान करू नये, असा इशाराही जवानांनी तिला दिला.
प्रवाशांचा संताप, विमानतळावर मोठी प्रतीक्षा
अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला असून, वेळेत माहिती न मिळाल्याने आणि अनेक तास ताटकळत बसावे लागल्याने प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसते. एक्स वर एका युजरने हा व्हिडिओ आणि परिस्थितीचे वर्णन शेअर केल्यानंतर ही घटना चर्चेत आली आहे.
विमान उशिराच्या वाढत्या तक्रारी
गेल्या काही काळात देशभरातील विविध विमानतळांवर विमान रद्द होणे किंवा उशीर होणे, आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण होण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. वेळेत माहिती न मिळणे, पर्यायी व्यवस्था न होणे यामुळे प्रवाशांचा रोष वाढत असल्याचे प्रवासी वारंवार नमूद करतात. या घटनांमुळे विमान कंपन्यांच्या नियोजनावर आणि प्रवासी सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान सध्या इंडिगोकडून या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.