Bharat Bandh: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज भारत बंद, CAIT च्या आवाहनानंतर महाराष्ट्रात पहा कोणकोणत्या सेवांवर होणार परिणाम
जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारीच्या दुपारी सुमारे 350 किलोच्या स्फोटकांचा ट्र्क घुसवून CRPF च्या बसवर हल्ला केला.
Pulwama Terror Attack Reactions: जम्मू काश्मिरमध्ये पुलवामामध्ये CRPF जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये त्याबाबत रोष आणि शोक अशा दोन्ही भावना व्यक्त केल्या जात आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (18 फेब्रुवारी) व्यापारी संघटनांनी आज बंद पुकारला आहे. कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेकडून देशभर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे पुन्हा एकदा चकमक सुरु; मेजरसह 4 जवान शहीद
कनफेडरेशन आफ आल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठा आणि व्यापार बंद ठेवून शहिदांना श्रद्धांजली देण्यात येईल. दिल्लीमध्ये पाकिस्तानी आणि चीनी बनावटीच्या वस्तू जाळल्या जातील. शहिदांच्या परिवारासाठी काही रक्कम गोळा करून तीदेखील शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवली जाईल.
महाराष्ट्रातदेखील ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. सावंतवाडी बाजारपेठेमध्ये सकाळी 9.30 वाजता शांततेमध्ये निषेध फेरी काढण्यात येणार आहे. तसेच या व्यापारी संघटनेकडून शहिदांच्या कुटुंबांसाठी 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये वाहतूक, शाळा, कॉलेज, यासारख्या सेवा नियमित सुरू राहणार आहेत.
जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारीच्या दुपारी सुमारे 350 किलोच्या स्फोटकांचा ट्र्क घुसवून CRPF च्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 40 हून अधिक जवान ठार झाले. या भ्याड हल्ल्याचा समाजातील प्रत्येक स्तरातून निषेध केला जात आहे.