Bengaluru's Loss Due to Traffic: ट्रॅफिक जाममुळे बेंगळुरूचे दरवर्षी जवळजवळ 20,000 कोटी रुपयांचे नुकसान; अभ्यासात झाला खुलासा

शिवाय, वाहतूक कोंडीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांवर विपरित परिणाम होतो.

Traffic प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

कर्नाटकची राजधानी बंगळुरू (Bengaluru) अनेक वर्षांपासून भीषण ट्रॅफिक जॅमचा (Traffic Jam) सामना करत आहे. बंगळुरू हे असे शहर आहे जिथे तुम्हाला कुठेही पोहोचायला किती वेळ लागेल हे गुगलदेखील व्यवस्थित सांगू शकत नाही. बेंगळुरूमधील वाहतूक कोंडीची चर्चा अवघ्या देशात होते. असे असूनही कर्नाटकच्या आर्थिक यशामध्ये बेंगळुरूचा मोठा वाटा आहे. भारताच्या सिलिकॉन व्हॅलीचे स्वप्न पाहत दरवर्षी हजारो लोक या शहरात येतात. गेल्या पंधरा वर्षांत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. आता येथे सुमारे 1.5 कोटी लोक राहतात. एक कोटीहून अधिक वाहने रस्त्यावर आहेत.

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका निवेदनात म्हटले होते की, सन 2027 पर्यंत शहरातील वाहनांची संख्या येथील लोकसंख्येपेक्षा जास्त असेल. अशात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ट्रॅफिक जॅममुळे बंगळुरूचे दरवर्षी साधारण 20,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते.

वाहतूक समस्या, वाहतूकीसाठी लागणार विलंब, गर्दी, रेड सिग्नलवर थांबणे व यामुळे वेळेचे होणारे नुकसान, पेट्रोलचा अपव्यय आणि अशाच संबंधित कारणांमुळे शहराला वार्षिक 19,725 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले की, कर्मचारी बराच काळ रहदारीत अडकतात, ज्यामुळे उत्पादकतेचे लक्षणीय नुकसान होते.

ट्रॅफिकशी संबंधित अडथळ्यांमुळे एकट्या आयटी क्षेत्राला सुमारे 7,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अभ्यासाचा अंदाज आहे. शिवाय, वाहतूक कोंडीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांवर विपरित परिणाम होतो. विलंबित शिपमेंट आणि असंतुष्ट ग्राहक यांचा परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर होत असून त्यामुळे सुमारे 3,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात उशिरा पोहोचल्याने लोकांना पगारात कपातीचा सामना करावा लागला आहे. (हेही वाचा: Stones Thrown at Vande Bharat Express: बाराबंकी येथे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक)

बेंगळुरू शहरात एकूण 60 उड्डाणपूल पूर्णपणे कार्यान्वित असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे, परंतु असे असूनही लोकांना रस्त्यांवर ट्राफिक जामचा सामना करावा लागत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, आयटी क्षेत्रातील रोजगार वाढीमुळे गृहनिर्माण, शिक्षण यासारख्या सर्व संबंधित सुविधांचा विकास झाला आहे. यामुळे लोकसंख्येमध्ये 14.5 दशलक्ष इतकी विलक्षण वाढ झाली आहे. त्याचवेळी शहरातील वाहनांची संख्याही दीड कोटींवर पोहोचली आहे. त्यानुसार शहराचा विस्तार 1 हजार 100 चौरस किलोमीटरपर्यंत असावा, असे या अभ्यासात प्रस्तावित करण्यात आले आहे. मेट्रो, मोनोरेल आणि उच्च क्षमतेच्या बस अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था वाढवण्याची गरज आहे, अशी शिफारस अभ्यास पथकाने केली आहे.