Bengaluru Flood: ऑफिसमध्ये पाणी शिरल्यावर चक्क कॉफी शॉपमध्ये डेस्कटॉप घेऊन पोहोचले कर्मचारी; फोटो व्हायरल (See)
बोम्मई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जारी केलेला निधी रस्ते, ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब आणि शाळा यासारख्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी वापरला जाईल.
बंगळुरूमध्ये (Bengaluru) मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) सर्वत्र हाहाकार माजला होता. आयटी ऑफिसपासून ते सधन परिसरातील आलिशान घरांपर्यंत सर्वत्र पाणी शिरले होते. घरे पाण्याखाली गेल्याने लोक बचावासाठी हॉटेलकडे वळले. या काळात हजारो लोक त्यांच्या कार्यालयापर्यंतही पोहोचू शकले नाहीत. अनेकांना घरून काम करण्याची सक्ती करण्यात आली. बेंगलोर हे एक आयटी हब असल्याने या पुरामुळे कंपन्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले.
बेंगळुरूमध्ये अचानक आलेल्या या पुराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र आता या आपत्तीशी संबंधित आणखी एक चित्र समोर आले आहे. ऑफिसमध्ये पाणी शिरल्यामुळे एक माणूस आपला डेस्क टॉप कॉम्प्युटर घेऊन कॉफी शॉपमध्ये पोहोचला. या ठिकाणी तासनतास बसून त्याने कामही केले.
संकेत साहू या ट्विटर वापरकर्त्याने दावा केला आहे की, पावसात बंगळुरूमधील थर्ड वेव्ह कॉफी शॉपमध्ये कंपनीचे काही कर्मचारी काम करत होते. विशेष म्हणजे सर्व लोक आपापले संपूर्ण डेस्क टॉप घेऊन बसले होते. हा फोटो 7 सप्टेंबरला शेअर करण्यात आला होता.
एवढेच नाही तर आयटी कंपनीत काम करणारे अनेक जण चक्क ट्रॅक्टरमध्ये बसून कार्यालयात पोहोचले. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ट्रॅक्टर मालकांनी त्यांच्याकडून 50-50 रुपये घेतल्याचे अनेकांनी सांगितले. सिलिकॉन सिटीमधील सर्वात अनन्य गेटेड कम्यूनिटी देखील पुराच्या पाण्यात बुडाला होता. एप्सिलॉनमध्ये देशातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांपैकी काही उगवत्या अब्जाधीशांचे व्हिला आहेत. येथील कोणताही व्हिला 10 कोटींपेक्षा कमी नाही. (हेही वाचा: Bangalore Floods: पुरामुळे कर्मचारी 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकले; बेंगळूरूच्या IT कंपन्यांना 225 कोटींचे नुकसान
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळुरूमधील पुराचा सामना करण्यासाठी 300 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. बोम्मई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जारी केलेला निधी रस्ते, ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब आणि शाळा यासारख्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी वापरला जाईल. बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचा कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी 3 दिवसीय जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्यावरही विपरित परिणाम झाला आहे, जो 2 नोव्हेंबरपासून होणार आहे.