Bengaluru: आता ऑफिसमध्ये कर्मचारी 30 मिनिटांसाठी झोपू शकतात; बेंगळुरूच्या स्टार्टअप कंपनीची घोषणा, मिळणार नॅप पॉड्स आणि शांत खोल्या

वेकफिट आपल्या कर्मचार्‍यांसाठी उत्तम झोपेचे वातावरण तयार करण्यासाठी कार्यालयात आरामदायक नॅप पॉड्स आणि शांत खोल्या तयार करण्याच्या दिशेने देखील काम करत आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

कार्यालयात डुलकी घेणे हे जवळ जवळ प्रत्येक कर्मचाऱ्यांचे स्वप्न असते. मात्र जर का ऑफिसमध्ये काम करताना चुकून डोळा लागला आणि ते जर का बॉसने पाहिले तर काही खैर नाही. मात्र बेंगळुरूस्थित (Bengaluru) D2C होम आणि स्लीप सोल्यूशन्स कंपनी वेकफिटने (Wakefit) कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या दरम्यान 30 मिनिटांपर्यंत डुलकी घेण्याची परवानगी दिली आहे. कंपनीने याला ‘राईट टू नॅप’ म्हटले आहे. कंपनीचे सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी बुधवारी पाठवलेल्या अंतर्गत मेलमध्ये सांगितले की, कंपनीचे सर्व कर्मचारी आता कामाच्या दरम्यान 30 मिनिटे झोपू शकतात.

वेकफिटच्या एका कर्मचाऱ्याने लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितले आहे. त्याने या मेलचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. रामलिंग यांनी त्यात लिहिले आहे, ‘आम्ही दुपारी काम करताना डुलकी घेणे ही एक सामान्य प्रथा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी 2 ते 2:30 पर्यंत अधिकृत झोपेची वेळ घोषित करत आहोत.’

रामलिंगगौडा यांनी आपल्या मेलमध्ये नमूद केले आहे की, ‘संशोधनानुसार, दुपारची झोप घेतल्याने व्यक्तीची स्मरणशक्ती, एकाग्रता, सर्जनशीलता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते. त्यांनी नासा आणि हार्वर्ड अभ्यासाचा हवाला देऊन म्हटले आहे की नासाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 26 मिनिटांच्या नॅपमुळे कामगिरी 33% ने सुधारू शकते, तर हार्वर्ड अभ्यास दर्शवितो की झोप घेतल्याने तुम्हाला थकवा येत नाही. (हेही वाचा: आता 'ड्रोन'च्या सहाय्याने डिलिव्हर होणार किराणा सामान; Swiggy सुरु करत पायलट प्रोजेक्ट)

वेकफिट आपल्या कर्मचार्‍यांसाठी उत्तम झोपेचे वातावरण तयार करण्यासाठी कार्यालयात आरामदायक नॅप पॉड्स आणि शांत खोल्या तयार करण्याच्या दिशेने देखील काम करत आहे. शेवटी ‘तुम्ही कार्यालयात झोपत आहात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे’, असे रामलिंगगौडा यांनी म्हटले आहे.