Bengaluru Covid JN.1 Variant: चिंता वाढली! बेंगळुरूच्या सांडपाण्यात आढळला कोविड-19 चा जेएन.1 प्रकार; नमुन्यांमध्ये आढळली 96 टक्के सकारात्मकता
टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक राकेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, बेंगळुरूमध्ये गोळा केलेल्या सांडपाण्याच्या नमुन्यांमधील सुमारे 45 टक्के व्हायरल लोड जेएन.1 प्रकाराला कारणीभूत आहे.
बेंगळुरूमधील (Bengaluru) टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटी (TIGS) ने केलेल्या अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविड-19 चा जेएन.1 प्रकार (Covid JN.1 Variant) हा सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळणारा प्रमुख प्रकार आहे. अनेक शहरांमधील सांडपाणी निरीक्षणावर लक्ष केंद्रित करणार्या या अभ्यासाने आपले निष्कर्ष ब्रुहत बेंगलुरु महानगर पालिकेला (BBMP) सादर केले आहेत. TOI च्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक राकेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, बेंगळुरूमध्ये गोळा केलेल्या सांडपाण्याच्या नमुन्यांमधील सुमारे 45 टक्के व्हायरल लोड जेएन.1 प्रकाराला कारणीभूत आहे. या अभ्यासात शहरभरातील 26 सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या (STPs) नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये 11 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत SARS-CoV-2 साठी शहरव्यापी सांडपाणी सकारात्मकता दर सुमारे 96 टक्के आढळून आला.
अभ्यासात 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत संकलित केलेल्या नमुन्यांमधील व्हायरल लोडमध्ये, 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीच्या तुलनेत तिप्पट वाढ दिसून आली आहे. मिश्रा यांनी स्पष्ट केले की, ही गोष्ट कोविड-19 ची लागण झालेल्या लोकांची वाढती संख्या दर्शवते. मिश्रा यांनी पुढे अधोरेखित केले की, जेएन.1 हा प्रकार हा धोकादायक नाही. यामध्ये कमीत कमी हॉस्पिटलायझेशनची शक्यता आहे. कोरोनाचे हे रूपे प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गावर परिणाम करते आणि त्यामुळे त्यांची ठळक लक्षणे समोर येत नाहीत. मात्र मिश्रा यांनी ज्येष्ठ नागरिक आणि कॉमोरबिडीटी असलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगण्यावर भर दिला. (हेही वाचा: Covid's JN.1 Variant in Maharashtra: 'कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नाही', मात्र कोविड अनुरूप नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे राज्य सरकारचे आवाहन)
दरम्यान, कर्नाटकात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात कोविड-19 च्या 173 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या 24 तासांत दोन जणांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य बुलेटिननुसार, या प्रकरणांसह राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 702 झाली आहे. यापैकी, कोविड जेएन.1 च्या नवीन प्रकारातील एकूण 145 प्रकरणांची नोंद झाली आहे.