BBC Documentary On PM Modi: बीबीसीच्या पीएम नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंटरीमुळे नवा वाद; सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केली तक्रार
बीबीसीने 2002 च्या गुजरात दंगलीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला लक्ष्य करणारी 2 भागांमध्ये ही मालिका दाखवली आहे.
ब्रिटीश मीडिया बीबीसीने (BBC) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) एक डॉक्युमेंट्री बनवली असून त्यावर जोरदार वाद सुरु आहे. 2002 च्या गुजरात दंगलीबाबत या माहितीपटात अनेक वादग्रस्त दावे करण्यात आले आहेत. 'इंडिया: द मोदी क्वेश्चन’ नावाच्या या माहितीपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्युमेंटरीमध्ये जे दाखवण्यात आले आहे, त्याच्याशी ते सहमत नसल्याचे सुनक यांनी सांगितले. भारताने या डॉक्युमेंट्रीबाबत अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, बीबीसीचा हा माहितीपट एक प्रॉपगँडा आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी शुक्रवारी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनविरुद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटाला प्रत्युत्तर म्हणून तक्रार दाखल केली. या माहितीपटात गुजरातमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या मोदींच्या हाताळणीवर शंका उपस्थित केली आहे.
जिंदाल यांनी ट्विटरवर ट्विट केले की, ‘देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना निवडून दिले. देशात संवैधानिक सरकार आहे आणि बीबीसी न्यूजने अशी डॉक्युमेंटरी प्रदर्शित करणे म्हणजे, केवळ भारतातच नाही तर जगभरात मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकवण्याचा कट आहे. त्यामुळे ते धोकादायक ठरू शकते आणि त्यावर कारवाई व्हायला हवी. देशाच्या अखंडतेवर हल्ला केल्याबद्दल, त्यांनी बीबीसीविरुद्ध तक्रार केली आहे. त्यांनी आयपीसीच्या कलम 121, 153, 153ए आणि बी, 295, 298 आणि अंतर्गत तक्रार केली आहे. (हेही वाचा: भारत जोडो यात्रेच्या 125 व्या दिवशी आज ; जम्मूत Kathua मध्ये Rahul Gandhi यांच्यासोबत शिवसेना खासदार, मुख्य प्रवक्ते संजय राऊत ही सहभागी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ही डॉक्युमेंटरी प्रसारित झाल्यापासून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. बीबीसीने 2002 च्या गुजरात दंगलीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला लक्ष्य करणारी 2 भागांमध्ये ही मालिका दाखवली आहे. त्यामुळे ब्रिटनमधील भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. आता हा माहितीपट निवडक व्यासपीठांवरून काढून टाकण्यात आला आहे. दरम्यान, 2002 मध्ये गोध्रा येथे हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ट्रेनला आग लावण्यात आली होती. त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत 1,000 हून अधिक लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतांश मुस्लिम होते.