Bat-bms App Viral Videos: चायनीज ॲप चालत्या ई-रिक्षा बंद करू शकते?

सोशल मीडियावर 'BAT-BMS' या चायनीज ॲपचे व्हिडिओ व्हायरल होत असून, याद्वारे चालती ई-रिक्षा बंद केली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. यामागचे तांत्रिक सत्य आणि सुरक्षिततेचा धोका काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या काही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक स्मार्टफोनचा वापर करून रस्त्यावरून चालणाऱ्या ई-रिक्षा अचानक थांबवताना दिसत आहेत. या व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की, 'BAT-BMS' नावाच्या एका चायनीज मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे जवळून जाणाऱ्या ई-रिक्षा रिमोटली (लांबून) बंद केल्या जाऊ शकतात. या प्रकारामुळे ई-वाहन (EV) चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या व्हायरल दाव्यांमागील तांत्रिक सत्य थोडे वेगळे आणि गुंतागुंतीचे आहे.

काय आहे 'BAT-BMS' ॲप आणि त्याचा उद्देश?

'BAT-BMS' हे एक खरे आणि कायदेशीर ॲप असून ते शेन्झेन ग्रीनर्जी टेक्नॉलॉजी (Shenzhen Grenergy Technology) या चीनी कंपनीने विकसित केले आहे. हे प्रामुख्याने एक 'बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम' (BMS) मॉनिटरिंग ॲप आहे. या ॲपचा मूळ उद्देश ब्लूटुथ-सक्षम (Bluetooth-enabled) लिथियम बॅटऱ्यांचा मागोवा घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हा आहे. याद्वारे बॅटरीचा charge, व्होल्टेज, तापमान आणि बॅटरीचे आरोग्य (Health) तपासता येते. तसेच याद्वारे बॅटरीची चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रक्रिया नियंत्रित केली जाते.

चालती ई-रिक्षा अचानक कशी थांबते?

सोशल मीडियावर लोक या ॲपचा गैरवापर करून 'प्रँक' (मजाक) करताना दिसत आहेत. भारतात वापरल्या जाणाऱ्या अनेक स्वस्त लिथियम बॅटरी पॅकमध्ये ब्लूटुथ-सक्षम BMS युनिट्स असतात. धक्कादायक बाब म्हणजे, या बॅटऱ्यांमध्ये कोणतीही पासवर्ड सुरक्षितता (Password Protection) नसते किंवा ती अत्यंत कमकुवत असते.

जेव्हा एखादी ई-रिक्षा रस्त्यावरून जात असते, तेव्हा १० ते १५ मीटरच्या ब्लूटुथ रेंजमध्ये असलेला कोणताही व्यक्ती या ॲपद्वारे त्या सुरक्षित नसलेल्या बॅटरीशी कनेक्ट होऊ शकतो. ॲपशी कनेक्ट झाल्यानंतर जर त्या व्यक्तीने बॅटरीचे 'डिस्चार्ज फंक्शन' बंद केले, तर मोटरला मिळणारा वीजपुरवठा तात्काळ थांबतो. यामुळे चालती ई-रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी अचानक बंद पडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chirag Sharma (@chirag.bhai.mitra.mandal)

सर्वच ई-रिक्षांवर याचा परिणाम होतो का?

व्हायरल दाव्यांमध्ये सर्वच ई-रिक्षा बंद पाडता येतात असे म्हटले जात असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. हे ॲप केवळ त्याच ई-रिक्षांवर नियंत्रण मिळवू शकते ज्यांच्यामध्ये सुसंगत ब्लूटुथ-सक्षम लिथियम बॅटरी बसवली आहे.

भारतातील अनेक ई-रिक्षा अजूनही पारंपारिक 'लेड-ॲसिड' (Lead-acid) बॅटऱ्यांवर चालतात, ज्यांना ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी नसते. याशिवाय, अनेक नामांकित कंपन्या त्यांच्या लिथियम बॅटऱ्यांसाठी स्वतःची सुरक्षित सॉफ्टवेअर यंत्रणा वापरतात, त्यामुळे 'BAT-BMS' ॲप त्या बॅटऱ्यांशी कनेक्ट होऊ शकत नाही.

हॅकिंग नाही तर सुरक्षेतील त्रुटी कारणीभूत

तज्ज्ञांच्या मते, हा कोणताही प्रगत सायबर हल्ला किंवा अत्याधुनिक हॅकिंगचा प्रकार नाही. हा प्रामुख्याने बॅटरी उत्पादकांचा हलगर्जीपणा आणि सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे. स्वस्त बॅटरी युनिट्स ग्राहकांना विकताना कोणतीही कडक सुरक्षा मानके किंवा पासवर्ड यंत्रणा न ठेवल्यामुळे हा गैरप्रकार घडत आहे.

रस्त्याच्या मध्यभागी अचानक वाहन बंद पडल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ई-रिक्षा चालकांनी आणि मालकांनी आपल्या वाहनातील ब्लूटुथ-सक्षम बॅटरी यंत्रणेला मजबूत पासवर्ड सेट करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement