Bareilly: मास्क घातला नाही म्हणून पोलीसांनी हाता-पायावर ठोकले खिळे; युवकाची तक्रार, पोलिसांना मिळाली क्लीन चीट
याचा विरोध केल्यावर पोलिसांनी त्याच्या हाता-पायात खिळे ठोकले. परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, मास्क घालण्याविषयी इशारा दिल्यावर त्याने पोलिसांना शिवीगाळ केली व फरार झाला
कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या काळात हा संसर्ग टाळण्यासाठी मास्क (Mask) घालणे फार महत्वाचे आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये या नियमाचे पालन करण्यासाठी कायद्याचा अवलंब केला जात आहे. परंतु या कायद्याच्या आडून, कायद्याचे रक्षणकर्ते माणुसकी विसरताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमधील बरेली (Bareilly) येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. बरेली येथील एका युवकाने आरोप केला आहे की, मास्क न लावल्याबद्दल पोलिसांनी त्याला दंडुक्याने मारले. याचा विरोध केल्यावर पोलिसांनी त्याच्या हाता-पायात खिळे ठोकले. परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, मास्क घालण्याविषयी इशारा दिल्यावर त्याने पोलिसांना शिवीगाळ केली व फरार झाला.
पोलीस पुढे असेही म्हणाले की, होणारी अटक टाळण्यासाठी त्याने स्वत: हातात खिळे ठोकले आहेत. ही घटना बरेलीच्या बारादरी पोलीस स्टेशन परिसरातील जगतपुरची आहे. पोलिसांविरुद्ध तक्रार घेऊन रणजित बरेलीच्या एसएसपी कार्यालयात गेला होता. मास्क न घातल्याने पोलिसांनी त्याला मारल्याचा आरोप त्याने केला आहे. जेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला तेव्हा त्याला जबरदस्तीने पोलीस स्टेशनवर नेत्यात आले व डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या हाता-पायावर खिळे ठोकले. (हेही वाचा: Covid-19 Vaccine Certificate सोशल मीडियावर शेअर केल्यास होऊ शकते फसवणूक; सरकारचा ट्विटद्वारे इशारा)
बरेलीच्या एसएसपीचे म्हणणे आहे की, मास्क घालण्याच्या इशारा दिल्यावर रणजितने पोलिसांशी गैरवर्तन केले आणि तो तेथून पळून गेला. त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. आता अटक टाळण्यासाठी तो हातावर खिळा मारून आला आहे. ही घटना 24 मे रोजीची व रणजीत 26 मे रोजी तक्रार घेऊन आला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अशाप्रकारची वर्तवणूक केल्याची पुष्टी झाली नाही. एसएसपी रोहितसिंग सजवान यांनी पोलिसांचा बचाव करत त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यांना हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत आहे.